Home /News /maharashtra /

'देशी दारूची दुकाने उघडी, पण मंदिरं मात्र बंद', वारकरी संप्रदायातील महाराजांची सरकारवर टीका

'देशी दारूची दुकाने उघडी, पण मंदिरं मात्र बंद', वारकरी संप्रदायातील महाराजांची सरकारवर टीका

पंढरपूरला एक लाखाच्या जवळपास वारकरी ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

अकोला, 22 ऑगस्ट : 'देशी दारूची दुकाने आज उघडी आहेत, पण मंदिरे बंद आहेत, हे सरकार हिरण्य कश्यपचं सरकार आहे,' असं म्हणत वारकरी संप्रदायाचे गणेश महाराज शेटे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. येत्या 31 ऑगस्टला सरकारला जाग करण्यासाठी पंढरपूरला एक लाखाच्या जवळपास वारकरी ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. ते अकोल्यातील पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. या पत्रकार परिषेदेला वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरही उपस्थित होते. वारकऱ्यांमध्ये आता महात्मा गांधी जिवंत झाले आहेत आणि ते 31 तारखेला आंदोलन करतील, असं विधान प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषदेमध्ये केलं आहे. 'मी मुख्यमंत्री असतो तर कोरोना संपला असं जाहीर केलं असतं,' असंही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी म्हटलं आहे. 'सरकारने अनलॉक प्रक्रिया केली नाही, तर लोकच अनलॉक करत आहेत. सरकारने लॉकडाऊन केलं, परंतु अनलॉक करण्याची चावी त्यांना सापडत नाही,' असा घणाघातही प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. एसटीमध्ये ई-पास लागणार नाही, परंतु खासगी गाडीला ई-पास लागतो, हा शासनाचा दुजाभाव आहे, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. सरकारने ई-पास सक्ती रद्द करावी अशी मागणीही प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने जिल्ह्याबाहेरील एसटी प्रवासाला परवानगी दिली आहे. मात्र खासगी वाहनांना ई-पासची सक्ती कायम ठेवली आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Uddhav thackeray

पुढील बातम्या