अकोला, 30 ऑक्टोबर : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास केंद्रीय मंत्र्यांसह राज्यातील मंत्र्याचे कपडे फाडून अधिकाऱ्यांना ठोकून काढण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिला आहे. ते अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदमध्ये बोलत होते. 5 नोव्हेंबरपासून स्वाभिमानी संघटना शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करणार असल्याची माहिती रविकांत तुपकर यांनी दिली आहे.
सरकारने हेक्टरी 25 हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांना त्वरित द्यावी, सोयाबीनला 6 हजार रुपये प्रति क्विंटलप्रमाणे भाव द्यावा, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. मागण्या मान्य न झाल्यास मंत्र्यांसह, अधिकारी व कर्मचारी कपडे फाडणे तसेच त्यांना झोडपणे हे सुद्धा आम्ही करू असा इशारा स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे.
स्वाभिमानीने दिलेल्या या इशाऱ्यानंतर राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांबाबत पुन्हा काही निर्णय घेणार का, हे पाहावं लागेल.
ठाकरे सरकारने केली होती मदतीची घोषणा
या आपत्तीत 10 हजार कोटी रुपये मदत देण्याचे निश्चित केले आहे. यात रस्त्यांची दुरुस्ती, शेतजमिनीची दुरुस्ती व इतर नुकसान भरपाईचा समावेश आहे
दिवाळीपर्यंत ही मदत दिली जाईल, अशी घोषणा काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारकडून करण्यात आली आहे. जिरायत, बागायत जमिनीसाठी 6800 प्रति हेक्टर ही केंद्राची मदत अपुरी आहे, त्यामुळे आम्ही ती प्रति हेक्टरी 10 हजार दोन हेक्टरच्या मर्यादेत देणार आहे. फळपिकांसाठी 18,000 रुपये प्रति हेक्टर ऐवजी 25 हजार रुपये प्रति हेक्टर मदत दिली जाईल, असंही सरकारकडून सांगण्यात आलं आहे.