अकोला, 26 डिसेंबर : अकोला शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या अप्पू टी पॉईंटजवळ गोळी झाडून एकाची हत्या केल्याची घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. गोपाल अग्रवाल असं मृतकाचं नाव असून हल्लेखोर घटनास्थळाहून पसार झाले आहेत.
अकोला एमआयडीसी परिसरात असलेल्या अप्पू टी पॉईंट जवळ गिट्टी खदानवरील व्यवस्थापक गोपाल अग्रवाल यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी रात्रीच्या सुमारास गोळीबार केला. दोन दुचाकीवर आलेल्या या हल्लेखोरांनी गोळीबार करून घटनास्थळाहून पळ काढला. आरोपीजवळ एक बॅग असून हल्लेखोर आरोपी फरार झाल्याची माहिती प्रथम दर्शनी नागरिकांनी दिली आहे.
या हल्ल्यांमध्ये गोपाल अग्रवाल हे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यासोबतच जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून परिस्थितीजन्य पुरावे गोळा करणे सुरू केले.
यावेळी गंभीर जखमी गोपाल अग्रवाल यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले होते. परंतु डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या हल्ल्यामागील कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.