बच्चू कडूंचा नवा फंडा; वेशांतर करून अधिकाऱ्यांची घेतली झाडाझडती

शासकीय यंत्रणा काम करत नसल्याने आज पालकमंत्र्यांनी वेशांतर करुन कार्यालयांचा आढावा घेतला.

शासकीय यंत्रणा काम करत नसल्याने आज पालकमंत्र्यांनी वेशांतर करुन कार्यालयांचा आढावा घेतला.

  • Share this:
अकोला, 21 जून : अकोल्याचे पालकमंत्री आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांनी वेशांतर करुन अकोला व पातुर शहरात विविध कार्यालय व अवैद्य धंद्याच्या ठिकाणी छापे टाकले. कृषी केंद्र, गुटखा दुकाने, महानगरपालिका अकोला, बँक, तहसील पातुर, पोलीस स्टेशन भेटी, रेशन दुकान या ठिकाणी बच्चू कडू यांनी छापे टाकले. यावेळी विदर्भ कोकण बँक, पुरवठा विभाग आणि रेशन दुकानांमध्ये चांगला अनुभव बच्चू कडू यांना आला. या ठिकाणी पैशांचे आमिष देत काम लवकर करून देण्याची विनंती वेशांतर केलेल्या बच्चू कडू यांनी केली. मात्र तीनही ठिकाणी चांगला अनुभव आल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं. मात्र अकोला जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात गुटखा विक्री होत असल्याची खंत बच्चू कडू यांनी व्यक्त केली आणि अकोल्यातील अशा अवैध धंद्यांना आळा घालू असं आश्वासनही बच्चू कडू यांनी दिलं. अकोला महापालिकेत आज प्रहार संघटनेच्या वतीने घरकुलांसाठी आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात पालकमंत्री बच्चू कडू हे स्वतः उपस्थित होते. त्यांनी या आंदोलनाच्या वेळी आयुक्तांना भेटायचे आहे असे म्हणत आयुक्तांच्या दालनात प्रवेश केला. पालकमंत्र्यांनी मुस्लीम व्यक्तीचे वेशांतर करत तोंडाला मास्क, फडके गुंडाळून आयुक्तांच्या स्वीय सहायकाला आयुक्तांच्या भेटीसाठी विनंती केली. पण, आयुक्तांच्या स्वीय सहायकाने नेहमी प्रमाणे त्यांना आयुक्त आता नाही. त्यांना भेटण्यासाठी दूपारी चार ते पाच या वेळेत या, असे पठडीतील सरकारी उत्तर दिले. आंदोलन स्थळी बच्चू कडू काही वेळ थांबले. पातूर येथील कलश व एसबी या दोन पानसेंटर येथे गुटखा मागितला. या दोन्ही ठिकाणी पालकमंत्री बच्चू कडू यांनी मोठ्या प्रमाणात गुटखा मागितला. गुटखा विक्री करणाऱ्याने तर, तुम्हाला जितका पाहिजे तितका देऊ, असे ठोस आश्वासन दिले. त्यानंतर पालकमंत्री तहसील कार्यालयात रेशनकार्ड तयार करण्यासाठी गेले. तिथे त्यांना नियमाप्रमाणे कागदपत्रे आणा तसे तयार होत नाही, असे सांगत शासकीय यंत्रणेने टाळले. तर तिथून पालकमंत्र्यांनी एका रेशन दुकानाला भेट देत तांदूळ पाहिजे असे म्हटले. पण, रेशन दुकानदाराने आता ऑनलाईन व्यवस्था असल्याचं सांगितलं. त्यामुळे अशा प्रकारे तांदूळ देऊ शकत नाही असे म्हणत नकार दिला. आज जिल्ह्यात पालकमंत्र्यांनी केलेल्या वेशांतराने शासकीय यंत्रणा चांगलीच धास्तावली आहे. शासकीय यंत्रणा काम करत नसल्याने आज पालकमंत्र्यांनी वेशांतर करुन कार्यालयांचा आढावा घेतला. या वेशांतराची आज संपुर्ण जिल्ह्यात दबक्या आवाजात चर्चा होती. ती पातुर येथील गुटख्यानंतर उघडकीस आली. पालकमंत्री बच्चू कडू यांनी वेशांतर करत ते जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणाचा आढावा घेत असल्याची चर्चा सकाळ पासून सुरु होती. पण, नेमके कुठल्या वेशात ते फिरत आहे याची कुणाला माहिती नव्हती. त्यामुळे पालकमंत्री कुठे आहेत. त्यांनी कोणाची झाडाझडती घेतली याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. पण, या सर्व घडामोडीत काही विभागांना याची चुणूक लागल्याने त्या विभागात मात्र कमालीची सजगता बाळगण्यात आली होती.
Published by:Meenal Gangurde
First published: