Home /News /maharashtra /

आशिया खंडातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीने निवडणूक प्रक्रियेवरच घातला बहिष्कार, 'हे' आहे कारण

आशिया खंडातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीने निवडणूक प्रक्रियेवरच घातला बहिष्कार, 'हे' आहे कारण

अकलूज ग्रामपंचायतीचं नगरपालिकेमध्ये रूपांतर होण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असतानाच येथील ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झालेली आहे.

अकलूज, 29 डिसेंबर : महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा उडाला आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या अकलूज ग्रामपंचायतीचं नगरपालिकेमध्ये रूपांतर होण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असतानाच येथील ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झालेली आहे. सोबतच नातेपुते महाळुंग श्रीपूर ग्रामपंचायतीचा नगरपंचायत होण्याचा प्रस्तावही अशाच पद्धतीने अंतिम टप्प्यात रखडलेला आहे. शासनाने तात्काळ ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपालिका आणि नगरपंचायतमध्ये करावं, अन्यथा निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकू असा, इशारा अकलूज येथील ग्रामस्थांनी दिला आहे. माळशिरस तालुक्यातील अकलूज नातेपुते तसंच महाळुंग श्रीपूर माळीनगर येथील वाढती लोकसंख्या पाहता सध्या अस्तित्वात असणाऱ्या ग्रामपंचायती ग्रामस्थांना नागरी सुविधा देण्यास अपुर्‍या पडत आहेत. त्यामुळे येथील ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायतमध्ये करावं, असा प्रस्ताव शासन स्तरावर दाखल केला होता. सप्टेंबर 2019 मध्ये त्या पद्धतीचा प्रस्ताव आधीसुद्धा शासन स्तरावर काढण्यात आलेला आहे. अकलूज येथे व्यापारी तसेच ग्रामस्थांची नुकतीच एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. सध्या या ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतमध्ये होण्याचा अंतिम निर्णय अपेक्षित आहे. असं असतानाच राज्य सरकारकडून निवडणूक आयोगाला या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांबाबत विनंती पत्र दिलेलं होतं. कोणताही विचार न करता प्रक्रिया सुरू झालेली आहे. दोन दोन वेळा निवडणुकांना सामोरं जाणं उमेदवारांना आणि मतदारांना प्रशासनाला अवघड जाईल. यामुळे या ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर करूनच येथील निवडणूक प्रक्रिया पार पाडावी अन्यथा ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Gram panchayat, Solapur, Solapur (City/Town/Village)

पुढील बातम्या