मुंबई, 14 मार्च : महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये लावणी सादर करणारी गौतमी पाटील मागच्या काही काळापासून वादात सापडली आहे. गौतमी पाटील आक्षेपार्ह लावणी सादर करत असल्याचा आरोप तिच्यावर वारंवार केला गेला. तसंच गौतमी पाटीलच्या लावणीच्या कार्यक्रमात अनेकदा हुल्लडबाजी आणि राड्याचे प्रकारही झाले, ज्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करण्याचीही वेळ आली.
राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनीच गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार चांगलेच संतापले. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी अशाप्रकारचे कार्यक्रम आयोजित करू नयेत, असा इशाराच अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला. तसंच हा मुद्दा विधानसभेत उपस्थित करणार असल्याचंही अजित पवार म्हणाले होते. अजित पवारांच्या या भूमिकेनंतर गौतमी पाटीलने माफी मागितली होती.
अजितदादा थेट बोलले
गौतमी पाटीलच्या मुद्द्यावरून अजित पवार पहिल्यांदाच थेट बोलले आहेत. अजित पवारांनी न्यूज 18 लोकमतला विशेष मुलाखत दिली. न्यूज 18 लोकमतचे संपादक आशुतोष पाटील यांनी विचारलेल्या अनेक राजकीय प्रश्नांना अजितदादांनी आपल्या खास शैलीत उत्तरं दिली.
...म्हणून त्या दिवशी डोळा मारला, अखेर अजितदादांनी केला खुलासा
गौतमीला विरोध का?
'अशा विषयांमध्ये फार काळ नाराजी ठेवायची नसते. एखाद्याने गोष्ट केली, त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. आपली परंपराच आहे, आपल्याकडून काही चुकलं तर दिलगिरी व्यक्त करून पुढे जातो. पण काही जण आपल्या मतावर ठाम असतात, तिथे मात्र प्रॉब्लेम होतो, तिथे नवी प्रश्न निर्माण होतो. अशा वेळी समजूदारपणा दाखवला पाहिजे. आमच्या पक्षातील कार्यकर्ते हे पक्षाच्या बॅनरखाली गौतमी पाटीलचे कार्यक्रम घेत होते. म्हणून मी बोललो. कलावंतांनी आपली कला सादर करत असताना जी काही नियमावली ठरवली आहे, त्यानुसार कला सादर केली तर कुणाचाच विरोध असण्याचे कारण नाही', असं अजित पवार म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajit pawar, Gautami Patil