पुणे, 21 जानेवारी : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची अंतिम फेरी होऊन आठवड्याभराचा कालावधी लोटला. तरीही अद्याप सेमीफायनलमध्ये सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांच्यातील लढतीवरून सुरू असलेला वाद चर्चेत आहे. सोशल मीडियावर यावरून आरोप प्रत्यारोप झाले, इतकंच नाही तर पंचांना धमकी देण्याचाही प्रकार घडला. दरम्यान, यावर आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सिकंदरवरून काही जण द्वेषाचं राजकारण करतायत, हे चुकीचं आहे अशा शब्दात ठणकावलं आहे.
अजित पवार यांनी महाराष्ट्र केसरीमधील वादावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, या महाराष्ट्र केसरीनंतर सोशल मीडिया आरोप प्रत्यारोपानी रंगून गेला होता. त्यात अनेकांनी हात धुवून घेतले हे चुकीचं हे. ज्यांना माहिती आहे त्यांनी त्यावर बोलावं. सिकंदरवरून काही जणांकडून द्वेषाचं राजकारण करण्यात येतंय असंही अजित पवार म्हणाले.
हेही वाचा : कोण आहे सिकंदर शेख? महाराष्ट्र केसरीतील पराभवानंतर होतेय चर्चा
खेळात कोणत्याही प्रकारचे राजकारण नको असं म्हणत अजित पवार यांनी जाहिरपणे महेंद्र गायकवाडची बाजू घेतली. तसंच यावरून कोणीही जातीधर्माचं राजकारण करू नये असं ते म्हणाले. कुस्ती काय असते हे ज्यांना समजतही नाही ते महाराष्ट्र केसरीमधील टांग डावाबद्दल बोलत होते अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.
महाराष्ट्र केसरीच्या सेमीफायनलमध्ये माती गटात सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांच्यात लढत झाली होती. या लढतीत महेंद्र गायकवाडने टांग डाव टाकला पण तो परफेक्ट बसला नसल्याचा आक्षेप सिकंदर शेखसह त्याच्या समर्थकांनी घेतला आहे. यावरून सिकंदरवर अन्याय झाल्याची भावनाही त्याच्या समर्थकांनी व्यक्त केलीय. दरम्यान, पंचांनी मात्र आपण योग्य निर्णय दिला असून कोणावर अन्याय केला असं वाटत नाही अशी प्रतिक्रिया दिली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajit pawar, Wrestler