अजित पवारांचं भाजपबरोबर जाण्याचं आधीच ठरलं होतं, असे दिले होते संकेत

अजित पवारांचं भाजपबरोबर जाण्याचं आधीच ठरलं होतं, असे दिले होते संकेत

एकच वादा..अजित दादा म्हणून ओळखले जाणारे अजित पवारांनी आज राष्ट्रवादीलाच मोठा हादरा दिला.

  • Share this:

मुंबई, 23 नोव्हेंबर : राज्याच्या  आजचा दिवस राजकीय भूकंपाचा ठरला आहे.  एकीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची चर्चा सुरू होती. तर दुसरीकडे भाजपने राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना सोबत घेऊन सरकार स्थापनही केलं आहे. परंतु, यासाठी अजित पवारांनी आधीच संकेत दिले होते.

एकच वादा..अजित दादा म्हणून ओळखले जाणारे अजित पवारांनी आज राष्ट्रवादीलाच मोठा हादरा दिला. अजित पवार यांनी भाजपमध्ये 9 आमदार खेचून नेले आहे. एवढंच नाहीतर स्वत: उपमुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली आहे. परंतु, हे घटत असताना 4 महत्त्वाच्या घडामोडी घडल्या होत्या ज्यात अजित पवारांची नाराजी उघड झाली होती. त्यांची हीच नाराजी आज बंड म्हणून पाहण्यास मिळाली.

१) विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाची चर्चा सुरू होती तेव्हा अजित पवार यांना आपला मुलगा पार्थ पवार यांना पुन्हा उमेदवारी द्यावी अशी इच्छा होती. पण पार्थ पवार हे आधीच लोकसभेत पराभूत झाल्यामुळे ती नाकारण्यात आली. त्यामुळे अजित पवार नाराज झाले होते. मध्यंतरीच्या काळात रोहित पवार यांच्या फेसबुक पोस्टवरूनही पवारांच्या घरात अंतर्गत कलह असल्याचं समोर आलं होतं. त्यावेळी खुद्द शरद पवारांना असा कोणताही कलह नाही, असं स्पष्ट करावं लागलं होतं.

२) विधानसभा निवडणुकीचा प्रचारादरम्यान  शरद पवार यांना ईडीने नोटीस बजावली होती. त्यावेळी शरद पवार यांनी या नोटीसीला उत्तर देण्यासाठी स्वत: ईडी कार्यालयात हजर होण्यासाठी निघाले होते. पण, नंतर ईडीलाच पवारांना न येण्याची विनंती करावी लागली. पवारांनी विरोधकांवर ईडीच्या माध्यमातून दबाव टाकला जातो. हा डाव भाजपवर उलटवला होता. तेव्हा अजित पवारांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन खळबळ उडवून दिली होती. त्यावेळी शरद पवार यांना नोटीस बजावली म्हणून राजीनामा दिला, असा दावा अजित पवारांनी केला होता. पण, जर असं असतं तर जेव्हा नोटीस बजावली तेव्हा अजित पवारांनी राजीनामा का दिला नाही, याचे उत्तर अजूनही पवारांनी दिलं नाही. त्यावेळीच अजितदादा हे राष्ट्रवादीतून बाहेर पडणार अशी शक्यता निर्माण झाली होती. विशेष म्हणजे, भाजपच्या नेत्यांनीही पवार कुटुंबातील एक मोठा नेता आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता.

3) जेव्हा भाजपने सत्ता स्थापन करण्यास नकार दिला त्यानंतर शिवसेनेला बोलवण्यात आलं. परंतू, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची पत्रंच न मिळाल्यामुळे सेनेला सरकार स्थापन करण्याचा दावा करता आला नाही. त्यानंतर राष्ट्रवादीला निमंत्रण देण्यात आलं होतं. राष्ट्रवादीला 24 तासांचा अवधीही दिला होता. परंतु, दुसऱ्याच दिवशी सकाळी 11 वाजता राष्ट्रवादीकडून राज्यपालांकडे मुदतवाढ करण्याची मागणी पत्र देण्यात आलं. मुदतवाढ पत्रामुळे राष्ट्रवादी सरकार स्थापन करू शकत नाही, असं स्पष्ट झालं आणि राज्यपालांनी पुढे राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली. आता हे जे पत्र होतं ते अजित पवारांनीच पाठवलं होतं, अशी माहिती सूत्रांनी दिली.

4) शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता स्थापनेसाठी मुंबईत बैठका सुरू होत्या. तेव्हा एका बैठकीतून अजित पवार अचानक बाहेर पडले. पत्रकारांनी जेव्हा अजितदादांना विचारलं असता 'मी बारामतीला चाललो' असं उत्तर दिलं होतं. त्यांच्या या उत्तरामुळे एकच खळबळ उडाली होती. खुद्द शरद पवार यांना अजित पवार यांनी मस्करी केली असेल असं सांगून सारवासारव करावी लागली. त्यानंतर अजित पवार आणि आघाडीचे नेते एकत्र बैठकीला बसले असे फोटोही दाखवण्यात आले होते. पण, आज ज्या प्रकारे अजित पवारांनी खेळी केली ते सगळं ठरवून होतं यावर शिक्कामोर्तब झालंय.

विशेष म्हणजे, आज अजित पवारांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यात स्थिर सरकार यावं, शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी एकत्र आलो असा खुलासा अजितदादांनी केला. तसंच आघाडीच्या चर्चेत अनावश्यक मागण्या होतं होत्या म्हणून भाजपला पाठिंबा दिला, अशी कबुलीही त्यांनी दिली.

=======================

First published: November 23, 2019, 4:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading