पंढरपूर, 08 एप्रिल : संभाजी भिडे यांनी केलेल्या कोरोनासंदर्भातील वक्तव्यावरून आता एक नवा वाद समोर येत आहे. या वक्तव्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारावाईचे संकेत दिले आहेत. 'मनोहर भिडेंचं वक्तव्य तपासून कारवाईचा निर्णय घेणार' असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.
भिडे यांनी सांगलीमध्ये लॉकडाऊनला विरोध करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी बोलताना त्यांनी काही अजब विधानं केली आहेत. 'कोरोना हा मुळी रोगच नाही. कोरोनामुळं मृत्यू होणारी माणसं जगण्याच्या लायकीचीच नाहीत', असं वक्तव्य मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी केलं आहे. एवढ्यावरच न थांबता 'मास्क लावण्याचा सिद्धांत कोणत्या शहाण्याने काढला, मास्क लावण्याची वगैरे काहीही गरज नाही', असं धक्कादायक विधान देखील भिडे यांनी केलं. प्रत्येकाला स्वतःच्या जीवाची काळजी आहे, त्यामुळे तो काळजी घेतो असं भिडे यांनी म्हटलं. लॉकडाऊन विरोधात लोकांनी बंड करायला हवा आणि अशा नियम करणाऱ्या शासनाला फेकून द्यायला पाहिजे असंही भिडे यांनी म्हटलं आहे.
वाचा - 'राजकारण करणारे करोत, सध्या कोरोना रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा'
भिडे यांच्या या वक्तव्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाचार घेतला. 'या माणसाने आधी बागेतल्या आंब्याबद्दल वक्तव्य केलं होतं. त्यात आता केलेलं वक्तव्य म्हणजे विनाश काले विपरीत बुद्धीचा प्रकार'असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. नेमकं वक्तव्य तपासून या प्रकरणी कारवाई करणार असल्याचं अजित पवार यांनी पंढरपुरात बोलताना म्हटलं आहे.
वाचा - पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूला WHO चा दणका; Covishield बाबत महत्त्वाचा निर्णय
कोरोनाचा वाढता उद्रेक पाहता त्याच्याशी लढा देण्याचं मोठं आवाहन समोर उभं ठाकलं आहे. दुसरीकडं कोरोनाविषयी बेताल वक्तव्येदेखिल समोर येत आहेत. या वक्तव्यांमुळं निर्माण होणारा संभ्रम आणि त्यावरून होणारे वाद हा आणखी वेगळा विषय. आता अशाच आणखी एका वक्तव्यावरून नवा वाद उभा राहत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajit pawar, Corona