राजेश भागवत, प्रतिनिधी
जळगाव, 18 जानेवारी : मध्यंतरी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी 'मला पक्षाने जबाबदारी दिली तर पवारांची बारामती देखील जिंकून दाखवू', असे विधान एका जाहीर कार्यक्रमात केले होते. मात्र, 'बारामती काय आहे ते माहिती आहे का? बारामतीत या तुम्हाला दाखवतोच', अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गिरीश महाजन यांना इशारा दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काढण्यात आलेल्या निर्धार परिवर्तन यात्रेनिमित्त शुक्रवारी पारोळा इथं आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. अजित पवार पुढे म्हणाले की, 'बारामती काय आहे ते माहिती नाही आणि चालले बारामती जिंकायला. बारामतीच्या लोकांनी आमच्यावर निस्सीम प्रेम केलं आहे. गेल्या 50 वर्षांपासून बारामतीकर आम्हाला निवडून देत आहेत. पवार साहेबांना 23 वर्षांपासून तर मला 27 वर्षांपासून मला बारामतीतून निवडून दिले जात आहे. असे असताना महाजन सांगतात की, बारामती जिंकून दाखवू. ते एवढं सोपे आहे का? तरीही इच्छा असेल तर जरूर बारामतीत या', असे खुले आव्हानही अजित पवार यांनी गिरीश महाजन यांना दिले.
'खडसे यांच्यावर मुख्यमंत्री नाराज असल्याने त्यांना बाहेर रहावे लागत आहे, ते कोणत्या गोष्टीत दोषी असतील तर त्यांना शिक्षा तरी द्या, नाहीतर सोडून द्या, मुख्यमंत्री फडणवीस हे खडसे यांच्यावर प्रेम करीत नाही हेच खरे आहे. हे सगळे होत असताना आम्ही जेव्हा सत्तेत असताना स्वाभिमान दाखवणारे खडसे गप्प का?, कोणाला घाबरत आहे हा आम्हाला ही प्रश्न पडला आहे', असं जयंत पाटील म्हणाले आहे.
================================