शिवसेनेकडून नवी मुंबई भाजपला आंदन, गणेश नाईकांसाठी GOOD न्यूज

शिवसेनेकडून नवी मुंबई भाजपला आंदन, गणेश नाईकांसाठी GOOD न्यूज

ऐरोली आणि बेलापूर दोन्ही मतदार संघ भाजपला देण्यास मातोश्री सकारात्मक असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

  • Share this:

विनय म्हात्रे, प्रतिनिधी

नवी मुंबई, 01 ऑक्टोबर : नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर हे दोन्ही मतदार संघ भाजपच्या वाटेला जाणार असल्याचं लक्षात येताच शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली आहे. सोमवारी रात्री शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात शिवसैनिकांनी एकत्र जमून घोषणा दिल्या. यावेळी शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे ही सादर केले. रविवारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ऐरोली आणि बेलापूरपैकी एक जागा शिवसेनेनी घ्यावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांना देखील केली. मात्र, मातोश्रीवरून या पदाधिकाऱ्यांना माघारी फिरावं लागलं होतं. उद्धव ठाकरे यांच्याकडून पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्यात आली. त्यामुळे नवी मुंबईतील दोन्ही मतदार संघ हे भाजपला मिळणार आहेत.

ऐरोली आणि बेलापूर दोन्ही मतदार संघ भाजपला देण्यास मातोश्री सकारात्मक असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. गणेश नाईक यांनी आपल्या कुटुंबातल्या इतर सदस्यांसह राष्ट्रवादीच्या 48 नगरसेवकांसोबत भाजपमध्ये प्रवेश केल्याने नवी मुंबईत राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडलं होतं. त्यामुळे आता नवी मुंबई भाजप आणि सेनेतून कोणाला उमेदवारी देणार यावर सध्या जोरदार चर्चा सुरू होती. पण नवी मुंबईतल्या दोन्ही मतदार संघात भाजपचं पारडं जड आहे. त्यामुळे या मतदारंसघात भाजप आपले उमेदवार उभे करणार आहेत.

इतर बातम्या - छगन भुजबळांविरोधात शिवसेनेचा हुकमी एक्का मैदानात, निकाल बदलणार का?

खरंतर सप्टेंबर महिन्यात शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा नवी मुंबईत दाखल झाली होती. बेलापूर आणि ऐरोली विधानसभेत यात्रेचं जोरदार स्वागत करण्यात आलं होतं. यावेळी आदित्य ठाकरे यांनी भाषण करताना बेलापूर विधानसभा मतदार संघात मी परत सभेसाठी येणार असून निवडणुकीनंतर विजयी मेळावा घेणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे नवी मुंबईत दोन विधानसभेपैकी बेलापूर विधानसभा शिवसेना लढवणार असल्याचे संकेत यावेळी त्यांनी दिले होते. पण भाजप या जागा लढवणार असल्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंच्या कार्यक्रमाला गणेश नाईकांची दांडी!

युतीची चर्चा अंतिम टप्प्यात असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नवी मुंबईत दोन कार्यक्रमांना उपस्थित होते. हे दोनही नेते अशा कार्यक्रमात एकत्र येणं याला वेगळं महत्त्व होतं. या दोनही नेत्यांना एकत्र येण्याला निमित्त होतं माथाडी कामगारांचे नेते अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे. तर दुसरा कार्यक्रम होता नवी मुंबईतल्या मराठा भवनाला भेट देण्याचा. हे दोन दिग्गज नेते एकत्र शहरात असताना नुकतेच राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आलेले ज्येष्ठ नेते गणेश नाईक हे मात्र या दोनही कार्यक्रमांना उपस्थित नव्हते. नाईकांच्या या अनुपस्थितीची जोरदार चर्चा आता सुरू झाली होती. या आधी भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नढ्ढा हे नवी मुंबईत आले असताना गणेश नाईक हे कार्यक्रम अर्ध्यावर सोडून काही मिनिटांमध्ये बाहेर पडले होते.

दरम्यान, या कार्यक्रमाला माजी खासदार संजीव नाईक मात्र उपस्थित होते. गणेश नाईक हे नाराज असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र, त्यांच्या नाराजीचं नेमकं कारण काय आहे याविषयी संभ्रम होता. नाईकांची निर्मिती असलेलं बावखळेश्वर मंदिर पाडण्यात आलं होतं. सुभाष देसाई यांनी त्या वेळी मंदिर वाचवण्यास मदत केली नाही असं नाईकांना वाटतं. त्यामुळे ते शिवसेनेवर नाराज असल्याचीही चर्चा होती.

Published by: Renuka Dhaybar
First published: October 1, 2019, 10:36 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading