टिफीन धुतला नाही म्हणून पायलटने कर्मचाऱ्याला मारलं, विमानाला दोन तास उशीर

टिफीन धुतला नाही म्हणून पायलटने कर्मचाऱ्याला मारलं,  विमानाला दोन तास उशीर

कर्मचाऱ्याच्या या स्पष्टवक्तेपणाचा त्या पायलटला राग आला. त्यांच्यात भांडण झालं आणि भांडणाचं पर्यवसन हाणामारीत झालं.

  • Share this:

बंगळुरू 19 जून :  Air Indiaची  आपल्या प्रवाशांच्या सुविधेबद्दल जागरुक असल्याची फारशी ख्याती नाही. त्यात आजच्या एका घटनेनं पायलटने Air Indiaची लाज घालवली. सहकारी कर्मचाऱ्याने जेवणानंतर टिफीन धुण्यास नकार दिल्याने पायलटने त्या कर्मचाऱ्यालाच चोप दिल्याची घटना बंगळुरू विमानतळावर घडली. या घटनेमुळे प्रवाशांचे हाल झाले आणि विमानाला दोन तास उशीर झाला.

बंगळुरूहून कोलकात्याला जाणाऱ्या विमानात ही घटना घडलीय. पायलटने जेवण करण्याआधी एका क्रु मेंबरला टिफीन गरम करून आणण्यास सांगितला. त्याने सर्व अन्न ओव्हनमध्ये गरम करून आणून दिलं. त्यानंतर पायलटने जेवण केलं आणि टिफीन धुऊन आणून दे असं त्याला सांगितलं. टिफीन धुणे हे आपलं काम नाही असं त्या कर्मचाऱ्याने पायलटला सांगितलं.

कर्मचाऱ्याच्या या स्पष्टवक्तेपणाचा त्या पायलटला राग आला. त्यांच्यात भांडण झालं आणि भांडणाचं पर्यवसन हाणामारीत झालं. भर विमानातच त्या दोघांची फ्री स्ट्राईल रंगल्याने कर्मचारीही अवाक् झाले. शेवटी इतर सहकाऱ्यांनी ते भांडण सोडवलं. काही प्रवाशांनी याची तक्रार केली. त्यामुळे त्या पायलट आणि कर्मचाऱ्याला ताबडतोब विमान सोडण्यास सांगण्यात आलं.

या सगळ्या गोंधळात विमानाच्या टेक ऑफला दोन तास उशीर झाला. नव्या पायलटची व्यवस्था करण्यासाठी उशीर झाल्याचं प्रवाशांना सांगण्यात आलं. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश एअर इंडियाने दिले आहेत. विमान उड्डाणाला काही वेळ राहिला असताना असं भांडण होणं याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

यामुळे विमानातल्या प्रवाशांच्या सुरक्षेचाही प्रश्न ऐरणीवर आलाय. पायलट जर एवढा शिघ्रकोपी आणि बेजबाबदार असेल तर सर्व विमानाची आणि प्रवाशांच्या सुरक्षेजी जबाबदारी त्याच्यावर कशी द्यावी असा सवाल आता विचारण्यात येतोय.

First published: June 19, 2019, 9:17 PM IST
Tags: air india

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading