भिवंडी, 14 ऑक्टोबर : एमआयएमचे (MIM) भिवंडी शहर जिल्हाध्यक्ष खालिद गुड्डू यांच्यावर दाखल करण्यात आलेले खंडणीचे गुन्हे हे राजकीय द्वेषातून षडयंत्र करून दाखल करण्यात आल्याचा आरोप एमआयएम खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jaleel) यांनी केला आहे.
एमआयएम शहराध्यक्ष खालिद गुड्डू यांच्यासह त्यांच्या तीन साथीदारांना 24 सप्टेंबरच्या रात्री ठाणे गुन्हे शाखेने एका बांधकाम व्यवसायिकाकडून एक लाख रुपयांची खंडणी स्वीकारताना अटक केली. त्यानंतर 15 दिवसात शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात निरनिराळ्या बांधकाम व्यावसायिकांच्या तक्रारीवरून खंडणीचे एकूण सात गुन्हे व बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
या मुद्द्यावरून खासदार इम्तियाज जलील यांनी पोलिस आयुक्त यांची भेट घेऊन याबाबत पोलिसांच्या एकूणच कारवाईबाबत संशय व्यक्त करणारे निवेदन दिलं आहे. भिवंडी येथे खालिद गुड्डू यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्या नंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
भिवंडी मधील विधानसभा निवडणुकीत खालिद गुड्डू यांना मिळालेल्या समर्थनामुळे सत्तेत बसलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री व समाजवादी पक्षाचे मोठे नेते यांच्या दबावामुळे पोलीस ही कारवाई जाणीवपूर्वक खालिद गुड्डू व एमआयएम पक्षाला बदनाम करण्यासाठी करीत असल्याचा आरोप जलील यांनी केला आहे.
खालिद गुड्डूवरील सर्व तक्रारी या 2014 ते 2019 दरम्यानच्या आहेत. त्यावेळी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. मग तेव्हा हे गुन्हे करताना पोलिसांचे संरक्षण खालिद गुड्डू यांना होते का? की त्यावेळी येथील जनतेचा पोलीस प्रशासना वर विश्वास नव्हता? असा सवाल इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला आहे.
'आम्ही कोणत्याही गुन्ह्याचं समर्थन करणार नाही. पण ज्या पद्धतीने कारवाई करण्यासाठी शे-दोनशे पोलिसांचा फौजफाटा आणणे व न्यायालयात नेताना ज्या पद्धतीने धिंड काढणे या बाबत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करणार असून खालिद गुड्डू यांना न्याय मिळवून बाहेर आल्यावर या राजकीय षडयंत्रामध्ये कोणकोण राजकीय नेते सामील आहेत त्यांची नावे जाहीर करू,' असा इशाराही इम्तियाज जलील यांनी दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.