मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Ahmednagar News: सारोळा कासारच्या मातीत कुस्त्यांचा थरार, पाहा कुणी मारली बाजी, Video

Ahmednagar News: सारोळा कासारच्या मातीत कुस्त्यांचा थरार, पाहा कुणी मारली बाजी, Video

X
अहमदनगर

अहमदनगर जिल्ह्यातील सारोळा कासारची मानाची कुस्ती युवा महाराष्ट्र केसरी विष्णू खोसे याने उपमहाराष्ट्र केसरी संतोष दोरवड याला आस्मान दाखवत जिंकली.

अहमदनगर जिल्ह्यातील सारोळा कासारची मानाची कुस्ती युवा महाराष्ट्र केसरी विष्णू खोसे याने उपमहाराष्ट्र केसरी संतोष दोरवड याला आस्मान दाखवत जिंकली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Ahmadnagar (Ahmednagar), India

    प्रियांका बोबडे, प्रतिनिधी

    अहमदनगर, 1 एप्रिल: उन्हाळा आणि गाव खेड्यातील यात्रा हे आगळवेगळे समीकरण आहे. गावच्या यात्रेत तमाशा आणि कुस्त्यांचे खास आकर्षण असते. अहमदनगर जिल्ह्यातील गावागावातील यात्रांत जंगी कुस्त्यांची मैदाने होतात. नुकतीच सारोळा कासार येथील निर्गुणशहावली बाबाची यात्रा झाली. या यात्रेत झालेल्या कुस्तीच्या थरारात तब्बल दीडशे मल्ल सहभागी झाले होते. मानाच्या कुस्तीत युवा महाराष्ट्र केसरी विष्णु खोसे याने उपमहाराष्ट्र केसरी संतोष दोरवड याला अस्मान दाखविले.

    7 तास सुरू होता कुस्त्यांचा थरार

    नगर तालुक्यातील सारोळा कासार येथे निर्गुणशहावली बाबा यांचा दर्गाह आह. दरवर्षी येथे यात्रा भरते. 3 दिवसीय वार्षिक यात्रोत्सवाची सोमवारी कुस्त्याच्या आखाड्याने सांगता झाली. यंदा यात्रेत जंगी कुस्त्यांचे मैदान आयोजित केले होते. तब्बल 7 तास कुस्तीचा आखाडा सुरू होता. यात 150 मल्ल सहभागी झाले होते. त्यामुळे उपस्थित कुस्तीशौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.

    युवा महाराष्ट्र केसरी विष्णू खोसेची बाजी

    सारोळा कासार येथील गावकऱ्यांनी यंदा प्रथमच पारंपारिक आखाड्याऐवजी कुस्त्यांचे मैदान आयोजित केले होते. यामध्ये विविध वजन गटात एकूण 75 कुस्त्या झाल्या. मानाची 2 लाख 11 हजाराची कुस्ती गावातील युवा महाराष्ट्र केसरी विष्णू खोसे याने उपमहाराष्ट्र केसरी संतोष दोरवड याला आस्मान दाखवत जिंकली. दुसरी 75 हजार इनामाची कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन अनिल ब्राह्मणे याने सांगलीचा महाराष्ट्र चॅम्पियन प्रदीप ठाकूर याच्यावर मात करत जिंकली. महाराष्ट्र चॅम्पियन अनिल लोणारी सुरेश पालवे तसेच मनोज फुले व ऋषी लांडे या दोन कुस्त्या बरोबरीत सुटल्या. पाचवी मानाची कुस्ती पुण्याच्या सागर कोल्हे याने काष्टीच्या अण्णा गायकवाड याच्यावर मात करत जिंकली.

    वडिलांकडून शिकले डावपेच, शेतकऱ्याचा मुलगा बनला कुमार महाराष्ट्र केसरी! पाहा Video

    भूमीपुत्रांचा सन्मान

    दुपारी 3 वाजता सुरू झालेले कुस्त्यांचे मैदान रात्री 10 वाजता संपले. तब्बल 7 तास चाललेल्या या कुस्त्यांसाठी गावकर्‍यांनी लोकवर्गणीतून 1 हजारापासून ते 1 लाख 11 हजारापर्यंत इनाम विजेत्या मल्लांना दिले. याशिवाय गावातील गुणवंत विद्यार्थी व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या भूमीपुत्रांचा सन्मान करण्यात आला. या मैदानी कुस्त्यांच्या नियोजनासाठी रवि कडूस, मच्छिंद्र काळे, फकीरतात्या कडूस, बबन तांबोळी, सुभाष धामणे, उत्तम कडूस, डॉ. श्रीकांत देशपांडे, सुरेश धामणे, जयप्रकाश पाटील यांच्यासह ग्रामपंचायत व सोसायटीचे पदाधिकारी, गावातील प्रमुख कारभारी यांनी परिश्रम घेतले.

    First published:
    top videos

      Tags: Ahmednagar, Local18, Wrestler