सुनिल दवंगे, प्रतिनिधीशिर्डी, 15 जून : राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब (Anil Parab) यांना ईडीनं (ED) समन्स बजावल्यानंतर त्यांनी साई चरणी धाव घेत साई मंदिरातील मध्यान आरतीला हजेरी लावली. "मला काल नोटीस आली पण मी मुंबईत नव्हतो. मला जेव्हा-जेव्हा ईडीकडून बोलवलं जाईल, त्यावेळी मी जावून त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देईन. मात्र भाजप नेते किरीट सोमय्या कोण? त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मी का देऊ?" असा सवालही अनिल परबांनी साई दर्शनानंतर माध्यमांशी बोलतांना केला.
ईडीने अनिल परब यांना आज ईडी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. साई रिसॉर्टप्रकरणी ईडीकडून तपास सुरु आहे. ईडीने साई रिसॉर्टप्रकरणी मे महिन्यात 7 ठिकाणी छापेमारी केली होती. त्यादिवशी अनिल परब यांची 13 तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आता अनिल परब यांना ईडीनं पुन्हा समन्स बजावलं आहे. साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. ईडीला साई रिसॉर्टच्या प्रकरणात मनी लाँड्रिंग झाल्याचा संशय आहे. ईडीने आता पुन्हा एकदा अनिल परब यांना समन्स दिल्यानंतर त्यांनी थेट साईबाबांच्या दरबारी धाव घेतली आहे.
विशेष म्हणजे अनिल परब यांच्या दौऱ्याची शासकीय यंत्रणांना कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. शिवसेनेचे अगदी मोजके पदाधिकारी त्यांच्यासोबत होते. साईमंदिरातील दुपारच्या आरतीला त्यांनी उपस्थिती लावली. यावेळी माध्यमांशी बोलताना किरीट सोमय्या यांच्या "कितीही पळाले तरी हिशोब द्यावे लागेल" या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिलं. "मी किरीट सोमय्याला उत्तर द्यायला बांधील नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
(सोनिया गांधींच्या प्लॅनिंगला पवारांनी दिला धक्का, राष्ट्रपती निवडणूक लढवण्यास नकार)
किरीट सोमय्या यांनी आरोप केल्यानंतर कारवाया होतात, असा दाना अनेकांकडून केला जातोय. यावर परबांनी टोला लगावला. "कदाचित ते ईडीचे प्रवक्ता असावेत", असा टोला त्यांनी किरिट सोमय्यांना लगावला.
ईडीकडून तुम्हाला वारंवार त्रास दिला जातोय का? या प्रश्नावर बोलतांना हे तुम्हीच शोधा, असा उलट सवाल परबांनी पत्रकारांना केलाय. मला जे प्रश्न विचारले जातात त्याचं उत्तर मी त्या एजन्सीला देईन. ते विचारतील त्याचे उत्तर त्यांना देईन. आज हजर होवू शकलो नाही. मात्र मुबईत गेल्यानंतर ईडी ऑफीसला जाईन. तस त्यांना कळवलं आहे, असं परबांनी सांगीतलं.
ईडीची नोटीस आली असतांना तुम्ही साईचरणी धाव घेतली. बाबाकडे काय मागीतलं? असा प्रश्न यावेळी परबांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर उत्तर दिलं. "मी नाशिकला बैठकीला आलो होतो. या भागात आलो की साईंचं आवर्जून दर्शन घेतो. आज दर्शन घेतले. इथून एक नवी ऊर्जा मिळते. साई चरणी मी महाराष्ट्रात चांगला पाऊस पडू दे", अशी प्रार्थना केल्याचं म्हटलं. दरम्यान, "माझ्यावर जे आरोप करताय त्यांनी करावेत. त्याची चौकशी व्हावी आणि सत्य बाहेर यावे", असंही परब यावेळी म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.