मुंबई, 25 ऑक्टोबर : मागच्या दोन दिवसांपूर्वी शिंदे सरकारकडून भूविकास बँकेत ज्या कर्जदारांचे कर्ज थकीत आहे, त्या शेतकऱ्यांचे पूर्णपणे माफ केल्याची घोषणा केली. यावरून राज्यातील राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यसरकारवर टीका केली. यावरून सत्ताधाऱ्यांकडून शरद पवार यांच्या टीकेवर पलटवार करण्यात येत आहे. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर भूविकास बँकेच्या निर्णयावरून निशाणा साधला आहे.
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, भूविकास बँकेचा बोझा अद्यापही शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर आहे. आता ते शंभर टक्के माफ झाले असून लोक त्यातून मोकळे झाले आहेत. शेतकरी कायमच परावलंबी राहिल्याशिवाय नेत्याचे महत्त्व वाढत नाही असले राजकारण अनेक वर्षापासून शरद पवार करत आले आहेत. त्यामुळे त्यांना दुःख होणे स्वाभाविक आहे, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली. ते अहमदनगर येथे बोलत होते.
हे ही वाचा : बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून मारहाण, पोलीस स्टेशनमध्येच राणे भडकले, Video
सरकार शेतकऱ्यांना स्वावलंबी होण्यासाठी एक एक पाऊल टाकत आहे. त्याच त्यांना दुःख होत आहे. त्या रकमा जुन्या होत्या, मग तुमच्या काळात का नाही माफ केल्या? सरकार तुमचं होतं तेव्हा तुम्ही काय करत होता? असा सवाल करतानाच त्यांनी विधान करताना पूर्ण माहिती घेणे आवश्यक होतं, असा टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार यांना लगावला.
नाना पटोलेंवरही निशाणा
दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, राज्य सरकार बरखास्त केलं पाहिजे या मागणीसाठी नाना पटोले राज्यपालांना भेटणार आहेत. त्यावर विखे-पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. नाना पटोले अशा घोषणा करत राहतात. त्यांनी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक घेऊन कार्यकारिणीच बरखास्त केली पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला.
लोकांचं जनमत सरकार बरोबर आहे. पण त्यांचे नेते भारत जोडो यात्रेला निघाले आहेत. मात्र भारत जोडो नंतर लोकांनी काँग्रेस छोडो केलेला आहे, असा चिमटाही त्यांनी काढला. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं कंबरड मोडलं. या संदर्भात प्रशासन कार्यवाही करत असून अनेक ठिकाणी ई-पंचनामे आणि पीकपाहणी केली जात आहे. ज्या भागात नुकसान झालं आहे, त्या ठिकाणी शंभर टक्के पंचनामे झाले पाहिजे अशा सूचना मी दिल्या आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
हे ही वाचा : Amey Khopkar : 'भोंगा सहन करतोय ना, मग...' 'त्या' ट्वीटवरून मनसे नेत्याची थेट धमकी
शिधा वाटपामुळे गरिबांची दिवाळी गोड
आनंदाचा शिधा हा सरकारचा पहिलाच प्रयोग होता. मोदींनी अडीच वर्ष मोफत धान्य दिलं. तर महाविकास आघाडीचे नेते आमच्यावर टीका करत आहेत. पेट्रोल, डिझेलचे दर माफ करा म्हटलं तेव्हा त्यांनी दारूचे दर माफ केले. अशी अवस्था मागच्या सरकारची होती. आमच्यावर टीका करण्यापेक्षा तुमचं काही दायित्व आहे की नाही?, असा सवालही त्यांनी केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.