अहमदनगर, 26 जानेवारी : भारतीय सैन्यदलात कर्तव्य बजावत असताना आजपर्यंत अनेक जवानांना वीरमरण आले आहे, या दुःखद घटनेमुळे अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाल्याचे कित्येक उदाहरणे आपण पहिले असतील. मात्र, हा दुख:चा डोंगर बाजूला करत पतीचे देशसेवेचे अपुरे स्वप्न पत्नीने पूर्ण केलं आहे. नगरमधील अकोले तालुक्यातील डोंगरगाव मधील अरुणा भारतीय सैन्यदलात भरती झाल्या आहेत.
27 डिसेंबर 2011 ला अरुणा आणि संभाजी सिताराम मेंगाळ यांचा विवाह झाला. विवाहाच्या 3 वर्षानंतर अरुणा जवान संभाजी मेंगाळ यांच्यासोबत अहमदाबाद येथे राहू लागल्या. भारत मातेची सेवा करण्याची अनेकांची इच्छा असते मात्र ते सर्वांच्या नशिबी नसते, ती सेवा करण्याची संधी मला मिळाली आहे, असं जवान संभाजी मेंगाळ हे कायम अरुणा यांना सांगायचे.
29-04-2020 रोजी कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या झटक्याने संभाजी सिताराम मेंगाळ शहीद झाले. काही क्षणात शहीद संभाजी मेंगाळ यांची पत्नी अरुणा आणि त्यांच्या मेंगाळ कुटुंबाचे स्वप्न धुळीस मिळाले. आजही जुन्या आठवणी सांगताना अरुणा यांना अश्रू अनावर होतात.
C-60 टीमचे जवान करणार भारत यात्रा, कारण समजल्यावर कराल सॅल्युट, Video
मेंगाळ कुटुंब तसे अकोले तालुक्यातील धामणगाव आवारी या गावचे मूळ रहिवासी. 60 वर्षापूर्वी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी म्हणून त्यांनी धामणगाव सोडले आणि डोंगरगाव गाठले. मोलमजुरी, धुणीभांडी करून जवान संभाजी यांची आई सीताबाई आणि वडील सिताराम सोनबा मेंगाळ यांनी लक्ष्मण, सदाशिव, संभाजी, कमल आणि ताराबाई या 3 मुले आणि 2 मुलींच्या उदरनिर्वाहासाठी मोठा संघर्ष केला. मात्र, त्याच दरम्यानच्या काळात मेंगाळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. जवान संभाजी यांच्या वडिलांचे निधन झाले. मोठा आधार मेंगाळ कुटुंबाचा गेला, मात्र, डोंगरगावच्या गावकऱ्यांनी जवान संभाजी यांच्या आईच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना साथ दिली.
अरुणाचा अभिमान
जवान संभाजी यांचा मोठा भाऊ लक्ष्मण मेंगाळ यांनी आईला साथ देत कमल आणि ताराबाई या दोन बहिणींचे आणि सदाशिव या भावंडांचे शिक्षण पूर्ण केले. आज मोठा भाऊ लक्ष्मण सिताराम मेंगाळ हे एस टी महामंडळात चालक म्हणून कार्यरत आहेत. तर दुसरा भाऊ सदाशिव सिताराम मेंगाळ हे पुणे येथे प्राध्यापक म्हणून सेवा देत आहेत. आमचा तिसरा भाऊ जवान संभाजी तो आज आपल्यात नाहीये मात्र त्याची जागा आमच्या लहान भावजयी अरुणा यांनी भरून काढलीये असं ते अभिमानाने सांगतात.
GD कॉन्स्टेबल पदावर नियुक्ती
शहीद जवान संभाजी मेंगाळ यांना प्रतीक मुलगा व मुलगी श्रेया आहे. आज त्यांच्या वीरपत्नीची भारतीय सैन्यदलात (C.I.S.F) मध्ये GD कॉन्स्टेबल पदावर नियुक्ती होऊन त्यांनी आपल्या पतीचे स्वप्न पूर्ण केले आहे, महिला अबला नसून सबला आहे. फक्त जिद्द, चिकाटी, कष्ट आणि परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी ठेवून धाडस करता आलं पाहिजे. परिस्थितीशी झुंजत धाडस करत अकोले तालुक्यातील सैनिक पत्नी अरुणा संभाजी मेंगाळ दु:खाला मागे टाकून रणांगणावरती पराक्रम गाजवण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. त्यांच्या या कामगिरीचे डोंगरगाव आणि धामणगाव आवारी, तसेच अकोले तालुक्यातून कौतुक केले जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ahmednagar, Local18