Home /News /maharashtra /

काँग्रेस नेत्यांचे महाविकास आघाडीबाबत एकमत नसल्याचं चित्र, अशोक चव्हाण-नाना पटोलेंमध्ये मतभेद?

काँग्रेस नेत्यांचे महाविकास आघाडीबाबत एकमत नसल्याचं चित्र, अशोक चव्हाण-नाना पटोलेंमध्ये मतभेद?

काँग्रेसबाबत (Congress) एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या दोन दिग्गज नेत्यांचं महाविकास आघाडीच्या मुद्द्यावर एकमत नसल्याचं चित्र आहे.

    अहमदनगर, 2 जून : आगामी महापालिका निवडणुकीच्या (Maharashtra Municipal Election 2022) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना (political happening) वेग आला आहे. काँग्रेसबाबत (Congress) एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या दोन दिग्गज नेत्यांचं महाविकास आघाडीच्या मुद्द्यावर एकमत नसल्याचं चित्र आहे. आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेनेसोबत (Shiv Sena) आघाडी करायची का? या मुद्द्यावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचं एकमत नसल्याचं चित्र आहे. कारण अशोक चव्हाण यांनी काँग्रेस आघाडीसाठी तयार असल्याचं म्हटलं आहे. तर नाना पटोले यांनी स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये महाविकास आघाडीबाबत एकमत नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. काँग्रेसचं शिर्डीत चिंतन शिबिर सुरु आहे. या शिबिराचा आज दुसरा दिवस आहे. या शिबिरातून काँग्रेसमध्ये महाविकास आघाडीबाबत मतभेद असल्याची माहिती समोर आली आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची भूमिका काय असेल यावरुन दोन काँग्रेसी नेत्यांमध्ये मतभेद असल्याचं समोर आलं आहे. एकीकडे आघाडीचा पर्याय स्वीकारायला तयार असल्याची माहिती अशोक चव्हाणांनी दिली आहे. पण नाना पटोले काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढविण्याची भूमिका घेत आहेत. त्यामुळे या दोन नेत्यांमध्ये मतभेद असल्याचं समोर आलं आहे. अशोक चव्हाण नेमकं काय म्हणाले? "महाविकास आघाडीत काही तक्रारी आहेत. पण मी काही म्हणत नाही की, रुलआऊट आम्ही केलेलं नाही. आघाडी आम्ही रुलआऊट केलेली नाही. आमची भूमिका आणि महाविकास आघाडीतील आमच्या सहकारी पक्षांची भूमिका या दोघांच्या भूमिकेवर अवलंबून आहे. पण काँग्रेस आघाडीसाठी तयार आहे", अशी भूमिका अशोक चव्हाण यांनी मांडली आहे. नाना पटोलेंची भूमिका काय? "काही ठिकाणी स्थानिक नेत्यांच्या मतानुसार निर्णय घेतले जातील. आमचा जो निर्णय झालेला असेल त्यामध्ये स्वबळावर निवडणूक लढल्या जातील", असं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये आघाडी करायच्या मुद्द्यावरुन काँग्रेसमध्येच एकमत नसल्याचं चित्र असल्याचं स्पष्ट झालं आहे. (काँग्रेसमध्ये नवे बदल, 51 जणांनी दिले स्वत:हून राजीनामे, नाना पटोलेंनी दिली माहिती) सुशीलकुमार शिंदे यांची भूमिका काय? काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी चिंतन शिबिरविषयी प्रतिक्रिया दिली. "आगामी महापालिका निवडणुकीत सर्वांना संधी मिळेल यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. आघाडी होईल न होईल, किंवा करणार न करणार हा भाग पक्षाच्या लेव्हलवर ठरविण्यात येईल. याबाबत लवकरच एकवाक्यता होईल", असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले. मुंबईत महाविकास आघाडीत धुसफूस दरम्यान, मुंबईत महापालिकेकडून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या आरक्षण सोडतीवर राजकारण पेटलं आहे. काँग्रेस नेते भाई जगताप यांनी आरक्षण सोडतीवरुन शिवसेनेवर निशाणा साधला. तसेच या आरक्षण सोडतीवरुन आपण न्यायालयात धाव घेणार असल्याचा इशारा भाई जगताप यांनी दिला आहे. त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील संबंध ताणले जाण्याची शक्यता कमी आहे.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या