अहमदनगर, 9 जानेवारी : काही दिवसांपूर्वीच भाजप भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराची मागणी केली होती. पडळकर यांच्या भूमिकेशी त्यांच्याच पक्षाचे अहमदनगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी असहमती दर्शविली आहे. एवढेच नव्हे तर कारण नसताना हा विषय उपस्थित करून समाजात विष कालविण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा टोलाही सुजय विखे पाटील यांनी पडळकर यांचे नाव न घेता लगावला. पण, आता पुन्हा एकदा भाजपच्याच आमदाराने नामांतरासोबत जिल्ह्याचे विभाजन करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता विखे पिता-पुत्र काय भूमिका घेते? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
भाजप आमदार राम शिंदे यांनी यावेळी अहमदनगर जिल्हा नामांतर आणि विभाजन करण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्षात असताना त्यांचा विभाजनाला पाठींबा असल्याची आठवण शिंदे यांनी करुन दिली. आमदार शिंदे म्हणाले, की अहमदनगर जिल्हा क्षेत्रफळाने सर्वाधिक मोठा आहे आणि त्यामुळे मी पालकमंत्री असताना माझी हीच भूमिका राहिली. जिल्ह्यातील सामान्य जनतेची देखील भूमिका आहे की जिल्ह्याचे विभाजन झालं पाहिजे. जिल्हा विभाजनाची चर्चा होत असतानाच जिल्ह्याचं नामांतरणाचा देखील प्रश्न उपस्थित झाला.
वाचा - 'भोंदूगिरी करणारे बाबा...', भगव्या वस्त्रांवरून विद्या चव्हाणांचं वादग्रस्त वक्तव्य
त्यावेळी विखेंचा पाठींबा होता : राम शिंदे
हा प्रश्न विधिमंडळात देखील उपस्थित झाला. त्यावेळी जिल्ह्याचे विभाजन होताच नामांतरण देखील झालं पाहिजे आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नाव देण्याच्या दृष्टिकोनातून विधिमंडळामध्ये चर्चा झाली. लोकांच्यामध्ये देखील चर्चा झाली, त्यावेळेस ही चळवळ लोकांनी हाती घेतली. जिल्हा विभाजनाला सध्याचे पालकमंत्री आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील या विभाजनाला पाठिंबा दिला होता. मला वाटतं सर्वच लोकप्रतिनिधी याच बाजूचे आहेत की जिल्हा विभाजन झालं पाहिजे. आपण जर पाठीमागची पाने चाळली तर त्यावेळेस विरोधी पक्ष नेता असताना देखील त्यांनी जिल्हा विभाजना पाठिंबा दिला होता. आता ते सत्ताधारी पक्षात असून महसूल आणि पालकमंत्री आहेत. या सरकारमधील ज्येष्ठ मंत्री आहे. त्यांची भूमिका त्यांनी सांगितली असेल तर मला माहित नाही. परंतु, जिल्हा विभाजन हे झालं पाहिजे, असे ठाम मत आमदार राम शिंदे यांनी मांडले
महाराष्ट्र क्रिकेट बोर्ड वर अशा पद्धतीचं राजकारण.. राम शिंदेंची रोहित पवारांवर टीका
महाराष्ट्राला मोठा क्रिकेटचा ऐतिहासिक वारसा आहे. आमच्या कालखंडापासून सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, रवी शास्त्री, दिलीप वेंगसरकर असे अनेक दिग्गज खेळाडू या महाराष्ट्राने दिले. ज्यांचा दूरपर्यंत क्रिकेटची संबंध नाही, अशा व्यक्तीला आणलं जातं काय, त्याच दिवशी त्यांना एमसीएचा अध्यक्ष केलं जाते काय? महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या संदर्भामध्ये विचार करायला लावणारी गोष्ट आहे. म्हणून अशा पद्धतीने फक्त कोणीतरी कोणाचा नातेवाईक आहे म्हणून या बोर्डावर बसवायचं. परंतु, खेळाचं अशा पद्धतीचं राजकारण किंवा बाजारीकरण करणं हे धक्कादायक असल्याची टीका आमदार राम शिंदे यांनी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.