साहेबराव कोकणे, प्रतिनिधी अहमदनगर, 18 जुलै : अहमदनगरच्या श्रीगोंदा इथल्या समाधान मोरेच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी आधी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला होता, मात्र आता पोलिसांनी याच प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल केलाय. चार दिवसांमध्ये या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे. श्रीगोंदा तालुक्यातील एरंडोलचा रहिवासी असलेल्या समाधान मोरेच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी अखेर खुनाचा गुन्हा दाखल केलाय. मोरे कुटुंबीय आणि एरंडोल ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर समाधानच्या खुनाला वाचा फुटलीय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेच्या दिवशी आरोपी दिलीप मांडे हा कामासाठी समाधानला सोबत घेऊन गेला होता, मात्र दुसऱ्या दिवशी समाधाननं आत्महत्या केल्याची बातमी आली. स्थानिक पोलिसांनी पंचनामा न करता समाधानचा मृतदेह शासकीय रुग्णालयात आणला. तसेच शासकीय रुग्णालयाच्या अहवालावरून पोलीसांनी आत्महत्याचा गुन्हा दाखल केला. मात्र समाधानच्या आई-वडिलांनी हत्येचा संशय व्यक्त केला. समाधानचे पालक आणि ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पोलिसांनी पुण्याच्या ससून रुग्णालयात समाधानच्या मृतदेहाचं पुन्हा पोस्टमार्टम केलं. डोक्यात आणि छातीमध्ये मार लागल्यामुळे समाधानचा मृत्यू झाल्याचं पोस्टमार्टम अहवालातून समोर आलं.
समाधान मोरेचे आई-वडिल आणि ग्रामस्थांनी तब्बल चार दिवस पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं होतं. सुरुवातील पोलिसांनी उडवडीची उत्तरे दिली होती. या प्रकरणात दोषी पोलीस अधिकारी आणि शासकीय वैद्यकीय अधिकारी यांच्यावर कारवाई वकरण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ससून रुग्णालयाच्या अहवालानंतर तब्बल चार दिवसांनी श्रीगोंदा पोलीसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी दिलीप मांडे सह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला. समाधान मोरेच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केलाय. मात्र या प्रकरणात हलगर्जीपणा करणारे पोलीस आणि आरोग्य अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केलीय. आता संबंधीत अधिकाऱ्यावर कारवाई होणार का हाच खर्चा प्रश्न आहे.

)







