लॉकडाऊनमध्ये केलेल्या मेहनतीने झाली कमाल, शेतकऱ्याने केली लाखो रुपयांची कमाई

लॉकडाऊनमध्ये केलेल्या मेहनतीने झाली कमाल, शेतकऱ्याने केली लाखो रुपयांची कमाई

कठीण स्थितीतही अपार कष्टाच्या जोरावर अहमदनगर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने यश खेचून आणलं आहे.

  • Share this:

अहमदनगर, 28 सप्टेंबर : लॉकडाऊनमध्ये अनेक व्यवसायांचं कंबरडं मोडलं. सर्वांना अन्न-धान्याचा पुरवठा करणारा शेतकरीही अडचणीत आला होता. मात्र अशा कठीण स्थितीतही अपार कष्टाच्या जोरावर अहमदनगर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने यश खेचून आणलं आहे. डाळिंबाच्या बागावर आलेल्या तेल्या रोगाने हजारो शेतकरी उद्धवस्त झालेले असताना अहमदनगर जिल्ह्यातील तरूण शेतकऱ्याने आपली बाग वाचवली आणि आज लाखो रूपयांचा नफा मिळवला आहे. जिद्द असेल आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर काहीही साध्य करता येतं हेच या तरूणाने दाखवून दिलं आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यात असणाऱ्या तीसगाव प्रवरा येथील हा तरूण शेतकरी शशांक कडू...परंपरागत शेती सोडून काहीतरी वेगळं करण्याच्या ध्येयाने त्याने 2016 साली बीएससी अॅग्रीचे शिक्षण पूर्ण केले आणि नोकरीच्या अनेक संधी असतानाही आपली घरची शेती करण्याचा निर्णय घेतला. गेल्या चार पाच वर्षापासून शशांक डाळिंबाच्या बागांसह इतर पिकांचे उत्पादन घेतलं आहे.

यावर्षी डाळिंबाच्या बागांवर तेल्या रोगाने हल्ला केल्याने अनेक शेतकऱ्यांना आपल्या बागांवर नांगर फिरवण्याची वेळ आली. अशाही परिस्थितीत शशांकने योग्य नियोजन आणि कष्ट घेतल्याने त्याची साडेतीन एकरावर असलेली डाळिंबाची बाग जगवली आणि आज त्याच्या बागेतून साधारण वीस टन डाळिंबाचे उत्पादन झाले असून खर्च झालेले चार लाख सोडून पंधरा लाख रुपये नफा त्याने मिळवला आहे.

साडेतीन एकरावर असलेल्या डाळिंबाला साधारण 100 रूपये किलोचा भाव मिळाला असून बांग्लादेशात हे डाळिंब निर्यात करण्यात आले आहे. शशांक गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांचे संघटन करत असून त्यांना आधुनिक शेतीचे मार्गदर्शनही करत आहे.

शशांक शेतीत घेत असलेल्या कष्टाचे घरच्यांनाही कौतूक वाटत आहे. केवळ शेती तोट्याची आहे असं न म्हणता जिद्दीने कष्ट केले तर परिस्थिती नक्कीच बदलू शकते. गेल्या चार वर्षात शशांकने केवळ डाळिंबातून एक कोटी रुपये कमावले आहेत. त्यामुळे इतर तरुण शेतकऱ्यांनेही पिकांचे योग्य नियोजन केल्यास यश त्यांच्यापासून दूर असणार नाही, हेच शशांकने दाखवून दिलं आहे.

Published by: Akshay Shitole
First published: September 28, 2020, 5:15 PM IST
Tags: Ahmednagar

ताज्या बातम्या