अहमदनगर, 7 फेब्रुवारी : अहमदनगर भिंगार पोलीस ठाण्याच्या हद्दीत 302 च्या गुन्ह्यात हलगर्जी केल्याप्रकरणी पोलीस ठाण्याचे इन्चार्ज प्रवीण पाटील यांना अखेर निलंबित करण्यात आलं आहे. खुनाच्या गुन्ह्याच्या तपासात हलगर्जीपणा केल्यामुळे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी ही कारवाई केली आहे.
2017 मध्ये भिंगार पोलीस ठाण्याच्या हद्दीत रमेश काळे या इसमाचा खून झाला होता. या प्रकरणात भिंगार पोलीस ठाण्यामध्ये आकस्मात मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर तब्बल तीन वर्षांनी या प्रकरणातील रमेश काळे याचा वैद्यकीय अहवाल पोलिसांना प्राप्त झाला होता. त्या अहवालात सदरचा मृत्यू हा इथेनॉलची दारू आणि मारहाणीमुळे झाल्या असल्याचे स्पष्ट झाले होते.
त्यानंतर तत्कालीन पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांनी या प्रकरणातील आरोपी 302 सारख्या गंभीर गुन्ह्याच्या शिक्षेस पात्र आहेत असा अहवाल दिला होता. एक वर्ष हा अहवाल पोलीस उपनिरीक्षक पाटील यांनी कुठलीही कारवाई न करता हा गुन्हा पेंडिंग ठेवला. त्यानंतर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पोलीस ठाण्याला भेट दिली असता त्यांना हा गुन्हा अकस्मात मृत्यूच्या नोंदीमध्ये नोंद असल्याचा दिसला.
हेही वाचा - लॉजचा मालकच चालवायचा वेश्या व्यवसाय, पोलिसांनी महिलेसह पकडले रंगेहाथ
मनोज पाटील यांनी तत्काळ हा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलीस अधीक्षक यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आणि या प्रकरणात पोलीस ठाण्याचे इन्चार्ज प्रवीण पाटील यांना तडकाफडकी निलंबित करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिले. त्यानंतर प्रवीण पाटील यांचं अखेर निलंब करण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ahmednagar, Crime news, Murder, Police