VIDEO : रामदास कदमांनी केला राष्ट्रवादीबद्दल मोठा गौप्यस्फोट

VIDEO : रामदास कदमांनी केला राष्ट्रवादीबद्दल मोठा गौप्यस्फोट

"यापुढे दुतोंडी साप कोण? याचं उत्तर अजित पवारांना मिळालं असेल", असा टोलाही कदम यांनी लगावला.

  • Share this:

  सागर कुलकर्णी,प्रतिनिधी

मुंबई, 01 जानेवारी : शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी अहमदनगर पालिका महापौरपदाच्या निवडीवरून राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. "राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहे. शिवसेना कधी सत्तेतून बाहेर पडते, आणि कधी आपण सत्तेत सहभागी होतो, याची घाई राष्ट्रवादीला लागली आहे", असा गौप्यस्फोट रामदास कदम यांनी केली आहे. तसंच, "यापुढे दुतोंडी साप कोण? याचं उत्तर अजित पवारांना मिळालं असेल", असा टोलाही कदम यांनी लगावला.

अहमदनगर महापालिका महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपच्या कमी जागा असून आपला उमेदवार निवडून आणला. राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्यामुळे भाजपचा महापौर विजयी झाला. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी आज पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला.

"राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे अनेक वेळा बोलतात की, भाजपविरोधात सर्व विरोधकांनी एकत्र आलं पाहिजे, आणि म्हणूनच महापौरपदासाठी मी स्वत: अजित पवार यांच्याकडे बोललो होतो. विखे पाटील यांच्याकडेही बोललो होतो. ज्या भाजपच्या विरोधात निवडणूक लढवतात, त्या भाजपलाच पाठिंबा देऊन राष्ट्रवादीने शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न केला आहे", असा आरोप कदम यांनी केला.

"राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहे. शिवसेना कधी सत्तेतून बाहेर पडते, आणि कधी आपण सत्तेत सहभागी होतो, याची घाई राष्ट्रवादीला लागली आहे. हे पुन्हा एकदा दिसून आलं आहे. यापुढे दुतोंडी साप कोण? याचं उत्तर अजित पवारांना मिळालं असेल", अशी टीकाही त्यांनी केली.

'राष्ट्रवादीने घेतले भाजपचे मुके'

भाजपने हात पुढे केला असता तर, पाठिंबा घेतला असता का? असा सवाल पत्रकारांनी विचारला असता, कदम म्हणाले की, " ज्यावेळी शिवसेना पक्षप्रमुखांनी एकला चलो रेची भूमिका घेतली होती, आम्हाला असं वाटलं होतं की, महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी उमेदवार उभा करतील. आणि त्यानंतर सेनेचा उमेदवार असेल, या निवडणुकीत सेनेला जास्त मतं मिळतील असा अंदाज होता, आणि आणखी तीन नगरसेवक आमच्या संपर्कात होती. असे 28 मतं आमच्याकडे होती. त्यामुळे आमचा महापौर निवडून येईल असं आम्हाला वाटलं होतं. मात्र, राष्ट्रवादीने पुन्हा एकदा विरोधी पक्षाची भूमिका असताना ती बाजूला घेऊन सत्ताधारी भाजपचे मुके घेण्याचा काम केलं आहे."

ते पुढे म्हणाले की, "राष्ट्रवादीला भाजपविरोधात यापुढे निवडणूक लढवण्याचा अधिकार नाही, सेना सत्तेतून बाहेर का पडत नाही, याचं उत्तर अहमदनगर येथून मिळाले आहे."

महापौर निवडीवर शरद पवार काय म्हणाले होते?

30 डिसेंबर रोजी शरद पवार यांनी नगरमध्ये पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी, "राष्ट्रवादीकडून भाजपला पाठिंबा देण्याचे आदेश नव्हते. ज्या नगरसेवकांनी भाजपला मदत केली, त्यांच्यावर येत्या पाच दिवसात कारवाई करू, अशी भूमिका मांडली होती.

तसंच, "नगर प्रकरणाचा आघाडीच्या बोलणीवर परिणाम होणार नाही. पक्षाचा आदेश मानला गेला नसेल तर ते अयोग्यच. त्यामुळे पक्षादेश डावलणाऱ्यांवर कारवाई केली जाईल,' असा इशाराही पवारांनी नगरसेवकांना दिला होता.

मुख्यमंत्र्यांची शिवसेनेवर टीका

"अहमदनगर महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत आम्ही शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता, पण त्यांच्याकडून कुणीही संपर्कच केला नाही", असा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 31 डिसेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन केला होता. तसंच, "महापौर निवडीच्या 3 दिवसाआधी सेनेच्या नेत्यांनी पुर्णपणे संपर्क तोडला आणि शेवटपर्यंत त्यांनी पाठिंबा मागितला नाही", असं स्पष्टीकरणही फडणवीसांनी दिलं होतं.

====================

First published: January 1, 2019, 2:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading