• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • मेहनत आणि प्रयोगाचं फळ, शेतकऱ्याने 3 एकर शेतीत केली 22 लाखांची कमाई

मेहनत आणि प्रयोगाचं फळ, शेतकऱ्याने 3 एकर शेतीत केली 22 लाखांची कमाई

काही शेतकरी आपल्या जिद्दीच्या जोरावर हे सर्व अडथळे पार करत मातीतून यशाचं पीक फुलवतात.

 • Share this:
  अहमदनगर, 24 फेब्रुवारी : शेतीवरील अस्मानी आणि सुलतानी संकटांची नेहमीच चर्चा होते. अनेक शासकीय धोरणांमुळे शेतकऱ्याची अडवणूक केली जात असल्याचा आक्षेप घेण्यात येतो. मात्र काही शेतकरी आपल्या जिद्दीच्या जोरावर हे सर्व अडथळे पार करत मातीतून यशाचं पीक फुलवतात. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जतमधील शेतकऱ्याची अशीच एक यशोगाथा समोर आली आहे. कर्जत तालुक्यातील पटेगाव येथील तीन भावांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. शेतात काहीतरी नवीन प्रयोग करण्याचे ठरवले अन् प्रथम सेंद्रिय पद्धतीने पेरूची बाग केली. या पेरूच्या बागेनेच त्यांना आता चक्क लखपतीच बनवले आहे. कर्जत ताल्युक्यातील पटेगाव येथील युवा शेतकरी निलेश शेवाळे यांनी तीन एकर  क्षेत्रातील पेरूच्या बागेतून तब्बल 22  लाख रुपयांचे उत्पन्न घेतले. निलेशने पारंपरिक शेती सोडून काहीतरी शेतीत नवीन प्रयोग करावा म्हणून पेरूची बाग केली. त्याने तीन एकर क्षेत्रावर शेतीची मशागत केली. त्यानंतर त्यात शेणखत आणि कोंबडी खत टाकले. त्यात 7 बाय 6 अंतरावर पेरूची एकरी 1000 झाडे लावली. पाणीपुरवठा ठिबक सिंचनने केला. त्यानंतर कोणत्याही प्रकारची रासायनिक खते टाकली नाहीत. केवळ शेणखताचाच वापर केला. शिवाय कुठलेही कीटकनाशकही फवारले नाही. त्यामुळे सेंद्रिय पद्धतीने पेरूचे उत्पादन घेतले. परिणामी त्याचा आकारही मोठा आणि चवही वेगळी जाणवली. याच गुणवैशिष्ट्यमुळेच या पेरूकडे ग्राहक आकर्षित होऊ लागला. हा पेरू केवळ स्थानिक बाजारपेठेत विकला गेला. तैवानी पेरू तीन एकर क्षेत्रात तैवान पिंक या गुलाबी वाणाचा पेरू घेतला आहे. सुमारे सोळा महिन्यांत तीन एकरांत 50 टनापर्यंत उत्पादन मिळाल्याचे निलेश सांगतात. निलेश यांना एकूण 24 लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. पेरूची विक्री पुण्याला केली असून किलोला 30 ते 60 रुपये दर मिळाला आहे. या पेरुचे वर्षभरात दोन बहार घेता येतात. योग्य प्रकारे व्यवस्थापन, छाटणी या बाबी जमल्या तर वर्षभर उत्पादन घेत राहता येते. टिकवणक्षमता जास्ती असल्याने नुकसान कमी होते. विशेषतः कमी पाण्यावर येणारे पेरूचे उत्पादन दुष्काळी भागासाठी फायदेशीर आहे. अन्य पेरूच्या तुलनेत यास दर चांगला मिळत असल्याचा अनुभव आहे असे निलेश यांनी सांगितले. 'कर्जत तालुका कायम दुष्काळी असल्याने सन 2017साली कृषी विभागाच्या मदतीने चार लाख कोटी लीटर क्षमतेचे शेततळे दीड एकरांवर उभारले आहे. सर्वच पिकांना ठिबकचा वापर करण्यात येतो. त्यामुळे पाण्यावही कमतरता जाणवत नाही, सध्या सहा बिहीरो आहेत. नवनवीन प्रयोग करावेत. त्यामुळे कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न मिळते. विशेष म्हणजे विषमुक्त शेती करण्यावर जास्त भर द्यावा. त्यामुळे मानवी आरोग्यावर कोणताही परिणाम होणार नाही,' अशी प्रतिक्रिया मातीतून यशाचं बिजारोपन केलेल्या निलेश शेवाळे यांनी सांगितलं.
  Published by:Akshay Shitole
  First published: