अहमदनगर, 17 ऑगस्ट : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं निवासस्थान 'सिल्व्हर ओक' येथील काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे शरद पवार (Sharad Pawar) यांचीही कोरोना चाचणी करण्यात आल्याची माहिती समोर आली. या वृत्ताला आता आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनीही दुजोरा दिला आहे.
'राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. त्यांच्या 6 कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून यामध्ये 3 अंगरक्षकांचा समावेश आहे. शरद पवार साहेब अतिशय तंदुरुस्त आहेत. त्याना कुठेही प्रॉब्लम नाही. मी स्वतः खात्री केली आहे. त्यांच्या अवती-भवती 400 ते 500 जणांची टेस्ट चालू आहे, त्यावर मी स्वतः लक्ष ठेवून आहे,' अशी माहिती राजेश टोपे यांनी अहमदनगर इथे बोलताना दिली आहे.
दुसरीकडे, 'शरद पवारांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली, पण साहेब चार दिवस कोणालाही भेटणार नाहीत. ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये ही कोरोना टेस्ट करण्यात आली,' अशी माहिती राष्ट्रवादी प्रवक्ते अंकुश काकडे यांनी दिली आहे.
पवारांचे राज्यव्यापी दौरे
राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर काही काळ शरद पवार यांनी घरीच थांबणं पसंत केलं होतं. मात्र अनलॉक प्रक्रिया सुरू होताच आणि राज्यातील कोरोनाचं संकट गडद होताच शरद पवार यांनी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. पवार यांनी राज्यभरातील विविध शहरांमध्ये जात कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला. तसंच स्थानिक नेते आणि प्रशासनाला याबाबत सूचना दिल्या.
या संपूर्ण दौऱ्यात शरद पवार यांच्यासोबत अनेक लोकांचाही वावर होता. मात्र निवासस्थानावरीलच काही व्यक्त कोरोनाबाधित झाल्यामुळे शरद पवार हे पुढील काही दिवस बैठका टाळतील, अशी शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.