अहमदनगर, 28 जून : अनैतिक संबंधांना विरोध केल्यामुळे अल्पवयीन मुलाच्या घरी जाऊन मारहाण करत त्याचा छळ केल्याच्या आरोपाखाली महापालिकेतील आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, अग्निशमन विभागाचा प्रमुख शंकर मिसाळ, महापालिकेतील एक कर्मचारी बाळू घटविसावे यांच्यासह मुलाची आई मनीषा सोनावणे यांच्याविरोधात अखेर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महापालिकेतील दोन जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात गंभीर कलमातंर्गत गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. 13 जून रोजी रात्री साडेआकरा वाजता नगर शहरात राहणाऱ्या मुलाच्या घरी जाऊन डॉ. अनिल बोरगे, शंकर मिसाळ आणि बाळू घाटविसावे यांनी दारु पिऊन आरडाओरड केली. याबाबत त्यांना जाब विचारला तेव्हा त्यांनी सदर अल्पवयीन मुलास शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप आहे.
मिसाळ आणि बोरगे यांनी यावेळी मुलास जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर घाटविसावे याने मुलाचे पाय धरून मिसाळ आणि बोरगे यांनी मुलास गच्चीवरून खाली ढकलून देण्याचा प्रयत्न केला. तसेच मिसाळ व बोरगे यांनी तीन महिन्यांपूर्वी घरी येऊन हाताला चटके दिल्याचा आरोप पीडित मुलाकडून करण्यात आला आहे.
हेही वाचा - टेम्पोतून वास आल्याने पोलिसांना बोलावलं, समोर जे दिसलं ते पाहून सर्वच हादरले
अग्निशमन विभागाचा प्रमुख शंकर मिसाळ हे आणि महानगर पालिकेत नर्स म्हणून काम करत असलेल्या मुलाची आई मनीषा सोनावणे यांचे अनैतिक संबंध असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे ते सर्व घरी येत होते. ते घरी आल्यावर नेहमी घरी येऊन दारू पित असत आणि आरडा ओरडा करत असत. त्यांना जाब विचारल्याने त्यांनी मारहाण केल्याचा आरोप मुलाने आहे. त्यामुळे चौघांविरोधात अखेर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.