अहमदनगर : मयत वडिलांची कबर शेतात बांधत असताना दोघी बहिणींवर जमावाने हल्ला करून त्यांना जखमी केले. नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथे दुपारी एक वाजता ही घटना घडली. या मारहाणीत जखमी झालेल्या सुजाता दिलीप पाटोळे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सुजाता पाटोळे यांच्या फिर्यादीनंतर आनंद जाधव, अर्चना जाधव, पप्पू काळपुंड, महेश शिंदे, भावड्या शिंदे, चैताली काळपुंड, मंडाबाई शिंदे, अलका शिंदे, कांता बळीत यांच्याविरोधात मारहाण करणे, गंभीर दुखापत करणे आणि साथरोग नियंत्रण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच याप्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सुजाता पाटोळे या 28 जुलै रोजी दुपारी त्यांच्या शेतात वडिलांची कबर बांधण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी आरोपींनी घटनास्थळी येऊन त्यांना विरोध केला. तसंच त्यांना लाकडी दांडा आणि लोखंडी गजाने मारहाण केली. या घटनेत सुजाता यांची बहीण बेशुद्ध पडली. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. पोलिसांनी योग्य फिर्याद घेतली नसल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे.
हेही वाचा - आधी एकतर्फी प्रेमातून 29 वर्षीय विवाहित महिलेला संपवलं, आता रुग्णालयात स्वत:ही सोडला जीव
दरम्यान, या घटनेप्रकरणात आता आणखी काही आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे. उर्वरित आरोपींना तात्काळ अटक करून शिक्षा दिली जाते का, हे पाहावं लागेल.