वैभव सोनवणे, प्रतिनिधीपुणे, 18 जानेवारी : सांस्कृतिक शहर म्हणून नावलौकिक असलेल्या पुण्यात दिवसेंदिवस गुन्ह्याचं प्रमाण वाढतच चाललं आहे. अत्यंत वर्दळीच्या आणि गजबजलेल्या पुण्याच्या मध्यवर्ती भागात चोरट्यांनी घरात घुसून बंदुकीच्या धाकावर 6 लाख रुपयांचे हिऱ्याचे दागिने लुटल्याची सिनेस्टाईल घटना घडली आहे. चोरटे एवढ्यावरच थांबले नाहीतर वृद्ध दाम्पत्याला ओलीस ठेवून अधिक रक्कम लुटण्याचा प्रयत्नही केला. तब्बल 4 तास हा थरार सुरू होता.
घडलेली हकीकत अशी की, पुण्याच्या मध्यवर्ती भागात असलेल्या आपटे रोडवर सरोज सदन नावाचा बंगला आहे.मुंबईतील रहिवासी असलेले हेमाजी गुलाबाचंद छेडा आणि गुलाबाचंद छेडा हे वृद्ध दाम्पत्य पुण्यात आपल्या हंस खिमजी या नातेवाईकांकडे आलेले होते. हे नातेवाईक ही वृद्ध आहेत. त्यांच्यासोबत ड्रायव्हर आणि एक काळजीवाहक महिला असताना हा प्रकार घडला.
चोरट्यांनी बंगल्यात घुसून तब्बल चार तास या वृद्ध जोडप्याला ओलीस ठेऊन सुमारे 6 लाख रुपयांचे हिऱ्याचे दागिने आणि पैसे लुटले. दागिने लुटल्यानंतर चोरट्यांनी आणखी पैशाची मागणी केली.
पण, या दाम्पत्याने पैसे हे मुंबईतील कार्यालयात असल्याचं सांगितलं. त्यानंतर चोरट्याने चक्क या जोडप्याचा ड्रायव्हरला सोबत घेऊन कार्यालयातून पैसे घेण्यासाठी मुंबई गाठली होती. तोपर्यंत या जोडप्याला इतर तीन चोरट्याने बंदुकीच्या धाकावर ओलीस ठेवलं होतं. मात्र, अखेर संयम संपल्याने या जोडप्यानं आरडाओरडा करायला सुरुवात केली. त्यामुळे चोरटे घाबरले आणि बंगल्यातून पळ काढला. बंगल्यातून बाहेर पडल्यानंतर या चोरांनी आपला चौथ्या साथीदार जो मुंबईकडे निघाला होता, त्याला फोन करून डाव फसला असल्याची माहिती दिली. त्यानेही ड्रायव्हरला वाटेतच सोडून पळ काढला.
घटना घडल्यानंतर छेडा दाम्पत्याने डेक्कन पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
विशेष म्हणजे, आपटे रोड सारख्या वर्दळीच्या रस्त्यावर असलेल्या बंगल्यात वृद्ध दाम्पत्य ओलीस ठेऊन तब्बल 4 तास हा थरार सुरू होता. या बंगल्यापासून अवघ्या अर्ध्या किलोमीटर अंतरावर पोलीस स्टेशन आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.
==========================