ठाणे, 04 मे: सुरुवातीला मनसेच्या पाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबतची आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. त्यानंतर ठाण्यातल्या (Thane) उत्तर सभेत आणि त्यानंतर औरंगाबादमध्ये (Aurangabad) झालेल्या सभेत राज ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं दिसून आलं. राज ठाकरे यांच्या ठाण्यातल्या सभेनंतर मुंब्रा येथे एका मुस्लिम पक्षाच्या पदाधिका-यांनी मुंब्रऱ्यात चौक सभा घेवून थेट राज ठाकरे यांना आव्हान दिलं होतं.
मुंब्रऱ्यात हनुमान चालीसा वाचूनच दाखवा असं आव्हान मुंब्रऱ्यातून मनसेला देण्यात आलं होतं. यालाच प्रतिउत्तर म्हणून ठाण्यातील कौसा जामा मश्जिद आणि दारूल मश्जिद या दोन्ही मशिदींसमोर हनुमान चालिसा लावू असं ठाण्यातील मनसैनिकांनी जाहीर केलं होतं. यानुसार ठाण्यातील कौसा जामा मश्जिद येथे आज पहाटे मनसैनिक येणार याची चुणूक मुंब्रा पोलिसांना लागताच त्यांनी संपूर्ण मुंब्राला छावणीचं स्वरुप देत सर्व मशिदींवर चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला.
मात्र पहाटे 5 वाजता मुंब्रऱ्यात मशिदींसमोर हनुमान चालीसा लावणार असं बोलणाऱ्या मनसेनं मुंब्रऱ्यात न येतां ठाण्यातील इंदिरानगर येथे पहाटे अजाण समोर हनुमान चालिसा भोंग्यावर लावली. त्यामुळे मुंब्रऱ्यात मनसैनिक का आले नाहीत अशी आता उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.
मुंबई, नाशकात कार्यकर्त्यांचा राडा
पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केल्याचं वृत्त समोर येत आहे. मुंबईत अनेक मनसे कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं. मध्यरात्री 1 वाजल्यानंतर कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यामुळे मुंबईत मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झाली आहे.
VIDEO: मुंबई, नाशकात मनसे कार्यकर्त्यांचा राडा, पोलिसांकडून धरपकड सुरु
नाशिकमध्ये मनसे कार्यकर्त्यांची धरपकड केली आहे. भद्रकाली पोलिसांनी जय श्रीरामच्या घोषणा देणाऱ्या महिलांना ताब्यात घेतलं आहे. छपरीच्या तालीम परिसरातील श्री जबरेश्वर या छोट्या मंदिरासमोर हनुमान चालीसा लावून कार्यकर्त्यांनी धूम ठोकली. त्यानंतर पोलिसांनी अॅप्लिफायरसह इतर साहित्य जप्त केलं आहे.
नाशकात पोलिसांचा चोख बंदोबस्त
नाशिकमध्ये सर्वच मशिदीबाहेर पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला आहे. अनेक मशिदीवरील भोंगे आज वाजले नाही. तर काही ठिकाणी कमी आवाजात अजान झाली. नोटीस आणि पोलीस बंदोबस्तामुळे शहराला छावणीचे स्वरूप आल्याचं नाशकात पाहायला मिळालं. नाशिक शहरात केवळ दोन मशिदीमधून भोंग्याद्वारे पठाण झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.