भिवंडी, 10 ऑक्टोबर: भिवंडी शहरातील ताडाळी-अंजुरफाटा रोड भागात क्षुल्लक वादातून अॅसिड हल्ला (Acid attack) करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात 5 जण होरपळले आहेत. तिघांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी ठाणे रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. शुक्रवारी रात्री ही घटना घडल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. जाब विचारण्यासाठी आलेल्या तरुणांवर आरोपींनी अॅसिड फेकून हल्ला केला.
हेही वाचा..ठाकरे सरकारचे येत्या काही दिवसांत तीन विकेट पडणार, भाजप नेत्यानं केला मोठा दावा
मिळालेली माहिती अशी की, भिवंडी शहरातील ताडाळी साईनगर येथील निखिल शर्मा हा गुरुवारी कामावरून घरी परतत असताना त्या परिसरातच राहणाऱ्या एका व्यक्तीनं दारूच्या नशेत त्याला मारहाण केली होती. नंतर निखिल शर्मा व त्याचे मित्र अभिषेक देशमुख, अभिषेक शर्मा, रोहित पांडे व सुरज पटेल हे जाब विचारण्यासाठी संबंधित व्यक्तीच्या घरी गेले होते. क्षुल्लक कारणावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यावेळी बेसावध असणाऱ्या पाचही तरुणांवर तीन ते चार जणांनी अॅसिड फेकून हल्ला केला. या अचानक झालेल्या हल्ल्याने हे पाचही तरुण गंभीररित्या होरपळे गेले.
जखमी तरुणांना तातडीनं स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. त्यापैकी अभिषेक देशमुख, निखिल शर्मा व अभिषेक शर्मा यांना गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी ठाणे येथील कळवा रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. नारपोली पोलिसांनी या जखमी युवकांचे जबाब नोंदवून तक्रार दाखल करण्यात आली आहे.
हेही वाचा...संपूर्ण महाराष्ट्र नोव्हेंबरपर्यंत होणार अनलॉक, राजेश टोपेंचं महत्त्वाचं विधान
10 लाखांचा सफेद रॉकेलचा साठा जप्त
दुसरीकडे, पर्यावरणास हानिकारक असलेल्या ज्वलनशील सफेद रॉकेलचा सुमारे 10 लाख 73 हजार 280 रुपये किमतीचा 22 हजार 360 लिटरचा साठा नारपोली पोलिसांनी जप्त केला आहे.
काल्हेर ग्रामपंचायत क्षेत्रातील जय मातादी कंपाऊंड येथील विजय छाया इमारतीच्या तळमजल्यावर प्लास्टिक व लोखंडी ड्रम व बॅरेलमध्ये सफेद रॉकेल साठवणूक केल्याचे आढळून आले. याबाबत कोणताही परवाना चौकशीत त्यांच्याकडे आढळून न आल्याने कंटेनर (क्रमांक MH 46 AR 2477) चालक लक्ष्मण चिमा डोंगरे (रा. पारनेर, अहमदनगर), टेम्पो (क्रमांक MH 04 KF 324) चालक गोविंद राठोड ( रा. राहनाळ, ता.भिवंडी ), गोदाम चालक पंकज म्हात्रे व गोदाम मालक नयन पाटील ( दोघे रा. काल्हेर ) व माल विकत देणारा शैलेश दुधेला ( रा.मुंबई ) यांना नारपोली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.