तक्रार न घेता लाथा-बुक्याने केली पोलीस अधिकाऱ्याने मारहाण, महिलेचा आरोप

तक्रार न घेता लाथा-बुक्याने केली पोलीस अधिकाऱ्याने मारहाण, महिलेचा आरोप

महिलेच्या तक्रारीनंतर पोलीस अधिक्षक या पोलीस अधिकाऱ्यावर काय कार्यवाही करणार याकडे लक्ष लागले आहे.

  • Share this:

बालाजी निरफळ, प्रतिनिधी

उस्मानाबाद, 20 मार्च : न्याय मागण्यांसाठी गेलेल्या महिलेला पोलिसांनीच मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उस्मानाबाद जिल्ह्यात घडला आहे. परंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक इकबाल सय्यद यांनी तक्रार दाखल करण्यास गेलेल्या महिलेला लाथा बुक्याने मारहाण केली असल्याची तक्रार पीडित महिलेने पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

या महिलेनं पोलीस अधीक्षक यांना केलेल्या तक्रारी नंतर हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सदर महिला तिच्या कुटुंबीयांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यामध्ये गेली असता पोलिसाने हे संतापजनक कृत्य केले आहे.

ही महिला आपल्या पती आणि नणंदेविरूद्ध तक्रार दाखल करून घेण्याची विनंती या पोलीस निरीक्षकाला करत होती. पीडित महिला पोलीस निरीक्षकास मला मारू नका, अशी हात जोडून विनवणी करत होती, तरी देखील या खाकी वर्दीत असलेल्या पोलिसाने थोडीही दया दाखवली नसल्याचे सदर पीडित महिलेने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.

त्या महिलेची मागणी ऐकून न घेता, 'तू पोलीस ठाण्याच्या बाहेर जा' असं सांगितलं. परंतु, महिलेने ठाण्याच्या बाहेर जाण्यास नकार दिला असता इकबाल सय्यद यांनी ठाण्यासमोर उभ्या असलेल्या महिलेला 'चल तुझे नावे घालतो , किती नावे घ्यायची?, पोच पाहिजे का तुला?' असे म्हणून मारहाण केल्याचा गंभीर आरोप पीडित महिलेने पोलीस निरिक्षकावर केला आहे.

या बाबतीत पत्रकारांनी पोलीस निरीक्षकाना फोनवर संपर्क साधला असता त्यांनी या घटनेचं खंडन केलं आहे. दरम्यान, महिलेच्या तक्रारीनंतर पोलीस अधिक्षक या पोलीस अधिकाऱ्यावर काय कार्यवाही करणार याकडे लक्ष लागले आहे.

First published: March 20, 2020, 11:55 AM IST

ताज्या बातम्या