शिवशाही बस कात्रज घाटात 25 फुट खोल दरीत कोसळली, अपघातात 2 प्रवाशांचा जागीच मृत्यू

शिवशाही बस कात्रज घाटात 25 फुट खोल दरीत कोसळली, अपघातात 2 प्रवाशांचा जागीच मृत्यू

कात्रजचा जूना घाट संपल्यावर शिंदेवाडी(हद्दीत) शिवशाही बस सुमारे 20-25 फुट खोल दरीत कोसळली.

  • Share this:

पुणे, 25 नोव्हेंबर : पुण्यातील कात्रजच्या जुन्या घाटात शिवशाही बसला भीषण अपघात झाला आहे. कात्रजचा जूना घाट संपल्यावर शिंदेवाडी(हद्दीत) शिवशाही बस सुमारे 20-25 फुट खोल दरीत कोसळली. ही बस स्वारगेटवरून सांगलीला जात होती. या अपघातामध्ये दोन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर इतर प्रवासी जखमी असल्याची माहिती देण्यात आली आहे. घटनेबद्दल समजल्यानंतर पोलीस आणि बचावपक्ष घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरू आहे.

चालकाचे नियंत्रण सुटल्याने आज दुपारी दीड वाजता हा अपघात झाला. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाल्याची भिती आहे. पोलिस आणि स्थानिक नागरीकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. क्रेनच्या मदतीने बसला दरीतून बाहेर काढण्यात येणार आहे. तर अपघातामुळे परिसरात वाहनांची गर्दी झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींना तात्काळ नजिकच्या स्थानिक रुण्यालयात दाखल करण्यात आलं आहे. तर दोन प्रवाशांचे मृतदेह ताब्यात घेतले असून त्यांची ओळख पटवण्याचं काम पोलिसांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, काही दिवसांआधी वारकऱ्यांच्या बसलादेखील भीषण अपघात झाला होता. त्यात 13 भाविकांचा मृत्यू झाला होता.

राजस्थानातल्या नागौर जिल्ह्यात मिनी बसला झालेल्या भीषण अपघातात महाराष्ट्रातील 13 भाविकांचा मृत्यू झाला असून 8 जण जखमी झाले होते. त्यापैकी चौघांची प्रकृती गंभीर आहे. कुचमान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील किशनगड-हनुमानगड मेगा हायवेवर शनिवारी हा अपघात झाला होता. लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातील याकतपूर येथून सर्व भाविक हरियाणातील हिस्सार येथे एका महाराजांच्या दर्शनाला मिनी बसने निघाले होते.

मृतांमध्ये लातूर जिल्ह्यातील सहा, सोलापूर जिल्ह्यातील दोन तर परभणी, सांगली, बीड जिल्ह्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. दोघे जण कर्नाटकातील असल्याची माहिती मिळाली आहे. आठ जण जखमी असून त्यांच्यावर नागौर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहिती अशी की, लातूर, सोलापूर, जिल्ह्यातील काही जण आपल्या नातेवाईक, मित्रांसोबत हरियाणातल्या हिस्सार येथे एका महाराजांच्या दर्शनासाठी जात होते. मिनी बस (एमएच-23 एएस 7176) शनिवारी पहाटे तीन वाजता राजस्थानातल्या नागौर जिल्ह्यातील कुचमान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किशनगड-हनुमानगड मेगा हायवे वरून जात होती. त्याचवेळी मिनीबसच्या समोर अचानक एक रानगवा आला. त्याला गाडीची धडक बसल्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. नंतर बस रस्त्याशेजारच्या एका झाडावर आदळली. बसचा वेग जास्त असल्यामुळे बसचा चक्काचूर झाला. 13 जणांचा जागेवरच मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले असून त्यातील चौघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर कुचामन येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 25, 2019 03:17 PM IST

ताज्या बातम्या