खेड, 10 डिसेंबर : मुंबई गोवा महामार्गावर भोस्ते घाटात दोन ट्रक आणि एक टिपर अशा तीन गाड्यांचा अपघात झाला आहे. या तिहेरी अपघातात तीनही गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले असून हा अपघात आज दुपारी 2 वाजता झाला. या प्रकरणी पाठीमागून ठोकर देणाऱ्या ट्रक चालकाविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राम पोपट गीते (वय 24) राहणार बीड हा आपल्या ताब्यातील ट्रक क्रमांक एमएच 08 बी आर 3324 घेऊन पनवेल ते लोटे ता.खेड येथे येत होता. मात्र वाटेतच भोस्ते घाटात समोरून एक ट्रक आणि एक टिपर येत असताना ट्रक क्रमांक एमएच 06 बिडी. 0511 ला त्याच्या पाठून येणाऱ्या टिपर क्रमांक एमएच 08 डब्ल्यू 8418 ने ठोकर दिली. त्यामुळे समोरील ट्रक राम गीते यांच्या ट्रकला धडकला.
या तिहेरी अपघातात तीनही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून या अपघातात कोणाही जखमी झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तर समोर चाललेल्या ट्रक ला पाठीमागून ठोकर देणाऱ्या टिपरचालकाविरोधात खेड पोलीस ठाण्यात भादंवि कलम 270,मोटार वाहन कायदा कलम 034, 184 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बराटे करत आहेत.