प्रदीप भणगे, (प्रतिनिधी)
कल्याण, 11 जुलै- विद्यापीठ उपकेंद्राच्या उद्घाटनाला युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थिती अभाविप-युवासेनेत राडा झाला. कार्यक्रम शिवसेनेने हायजॅक केल्याचा आरोप अभाविपचा केला. मनसेने सुद्धा या वेळी मूक निदर्शने केली.
कल्याणमध्ये गुरुवारी मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राचे उद्घाटन झाले, मात्र हा कार्यक्रम गाजला तो अभाविप आणि युवासेनेच्या राड्यामुळे आणि तेही थेट आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत. युवासेना आणि अभाविप यांचा वाद तसा नवा नाही. विद्यापीठाच्या निवडणुका असो, किंवा एखादं आंदोलन, विद्यार्थ्यांचा कैवार घेणाऱ्या या दोन्ही संघटना नेहमीच एकमेकांच्या विरोधात उभ्या ठाकल्याचं आजवर अनेकदा पाहायला मिळालंय. मात्र, आज हा वाद थेट मंत्री, कुलगुरू आणि आदित्य ठाकरेंच्या समोरच उफाळून आला. निमित्त होतं ते मुंबई विद्यापीठाच्या कल्याणमधल्या उपकेंद्राच्या उद्घाटनाचं..
या कार्यक्रमाला आदित्य ठाकरे येणार, म्हणून अभाविपने आधीपासूनच निषेधाची भूमिका घेतली होती. विद्यापीठाच्या कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी चालतील, पण राजकीय पदाधिकारी नको, असं अभाविपचं म्हणणं होतं. सकाळी कार्यक्रमस्थळाबाहेर मनसे सुद्धा निदर्शनं केलं आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांनी पण तरीही कार्यक्रम सुरू झालाच आणि मग अभाविपनं थेट कुलगुरूंचं भाषण सुरू असतानाच निषेधाच्या घोषणा दिल्या. यामुळं सभागृहात एकच गोंधळ उडाला आणि युवासैनिक थेट अभाविप कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून गेले. पोलीस आम्हाला बाहेर काढत असतानाही युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला मारहाण केल्याचा आरोप अभाविप कार्यकर्त्यांनी केला आहे. तर उपकेंद्रच्या जागेसाठी मी प्रयत्न केले आहे आणि या कार्यक्रमला सर्वांना आमंत्रण दिले पाहिजे होते, जेणे करून एवढा गोंधळ झाला नसता असे मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर यांनी सांगितले.
ज्यावेळी हा प्रकार घडला, त्यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांचं भाषण सुरू होतं. तर आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, रवींद्र वायकर, असे शिवसेनेचे नेते मंचावर उपस्थित होते. युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी शांत राहावं, असं आवाहन यावेळी आदित्य ठाकरेंना माईक हाती घेऊन करावं लागलं. मात्र तरीही कार्यकर्ते काही शांत झाले नाहीत. अखेर या सगळ्यानंतर चांगल्या कामात तरी सर्व संघटनांनी एकत्र यावं, असं आवाहन आदित्य ठाकरेंना करावं लागलं.
या सगळ्यानंतर पोलिसांनी अभाविप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय तर सदर कार्यक्रमला मात्र भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार कपिल पाटील आणि आमदार नरेंद्र पवार गैरहजर होते.
मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारचे नवे निर्णय जाहीर, या आहे 18 महत्त्वाच्या बातम्या