नवी मुंबई, 25 सप्टेंबर : राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या (Maharashtra Health Department recruitment) गट क आणि गट ड संवर्गातील भरती प्रक्रियेची लेखी परीक्षा 25 आणि 26 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार होती. मात्र, या भरती प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या हॉल तिकीटमध्ये प्रचंड चुका (mistakes in hall tickets) आणि घोळ आढळून आले. यानंतर आरोग्य विभागाने ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. या भरती प्रक्रियेच्या संदर्भात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गंभीर आरोप केला आहे.
नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड रोष आहेत. परीक्षेसाठी विद्यार्थी आपल्या घरातून निघाले आणि आदल्या रात्री त्यांना समजतं की परीक्षा रद्द झाली. या सरकारमध्ये नेमकं काय चाललं आहे हे कळत नाही. परीक्षा कधी घेतात कधी रद्द करतात. ज्या प्रमाणे प्रवेशपत्र देण्यात आलं आहे कुणाला उत्तरप्रदेशातील ठिकाण तर कुणाच्या प्रवेशपत्रात इतर घोळ. इतकेच नाही तर मला अशाही तक्रारी मिळाल्या आहेत की, आता काही दलाल मार्केटमध्ये आले आहेत. या पदांकरता 5 लाखांपासून, 10 लाखांपासून पैसे गोळा करण्यासाठी काही दलाल काम करत आहेत. मला असं वाटतं हे अत्यंत गंभीर आहे. या संपूर्ण प्रकरणाकडे सरकारने गांभीर्याने पाहिलं पाहिजे. चौकशी व्हायला पाहिजे.
अखेर आरोग्य विभागाची परीक्षा रद्द, हॉल तिकीटाच्या गोंधळामुळे मोठा निर्णयपरीक्षा पुढे ढकलली
आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेतील घोळानंतर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. यावर आरोग्य विभागाने स्पष्टीकरण देत म्हटले, ही परीक्षा घेण्यासाठी न्यासा कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीशी करार करण्यात आला होता. या कंपनीची निवड राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागा (माहिती तंत्रज्ञान) यांच्या एकवीस जानेवारी 2021 रोजी ओएमआर व्हेंडौर पॅनेलची नियुक्ती करण्यात आली आहे. या पॅनेलमधील सर्व कंपन्यांच्या सक्षमता तपासणी साठी सर्वंकष चाचणी विभागाच्या वतीने घेण्यात आली होती. शासन नियुक्त पॅनेलमधील चाचणीत प्रथम आलेल्या न्यासा कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीस भरतीचे काम करण्यासाठी करारबद्ध केले होते. करारातील अटीनुसार आरोग्य विभागाने प्रश्न पत्रिका संच गोपनीय रित्या कंपनीस हस्तांतरण करणे एवढीच जबाबदारी विभागाची होती.
भरती प्रक्रियेसाठी संकेतस्थळ विकसित करणे, ऑनलाईन अर्ज मागवणे, उमेदवारांना प्रवेशपत्र देणे, शाळा महाविद्यालये अधिग्रहित करुन बैठक व्यवस्था करणे, लेखी परीक्षा घेणे, गुणवत्ता यादी तयार करणे ही सर्व कामे कंपनीची होती. मात्र आरोग्य विभागाने सर्व सहकार्य करुन देखील न्यासा कम्युनिकेशन कंपनी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना प्रवेशपत्र देण्यात आणि बैठक व्यवस्था करण्यात अपयशी ठरली आहे. परीक्षेची पूर्व तयारी पूर्ण न झाल्याने कंपनीच्या संचालकांनी आज सायंकाळी सात वाजता परीक्षा घेण्यासाठी असमर्थता दर्शवली. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली.
अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना प्रवेशपत्र मिळाली याची खात्री करुनच परीक्षेचे आयोजन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी चर्चा केली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयामुळे उमेदवारांना झालेल्या मानसिक त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. ही परीक्षा सर्व तांत्रिक बाबींची पूर्व तयारी करुन लवकरच घेण्यात येईल. परीक्षेची नियोजित तारीख सर्व उमेदवारांना विभागाचे संकेतस्थळ, ई-मेल, एसएमएस व्दारे कळविण्यात येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.