मुंबई, 7 जानेवारी : युपी आणि बिहारमध्ये गुंडागर्दीचे प्रकार खुलेआम घडताना आपण ऐकत वाचत असतो. मात्र महाराष्ट्रातही आता असा हिंसक तोडफोडीचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार घडला मुंबईत. मुंबईसारख्या (Mumbai) सेफ सिटी म्हणवणाऱ्या शहरात उल्हासनगरमध्ये (ulhasnagar) 15 ते 20 गुंडाच्या टोळीने काल रात्री प्रचंड दहशत माजवली. या टोळक्यानं नंग्या तलवारी हातात घेत दगडफेक केली. विशेष म्हणजे, आता हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही (CCTV Camera) कैद झाला आहे.
काल रात्री निर्जन शांततेत बहुसंख्य नागरिक झोपेत असताना अचानक हा प्रकार घडला. थेट नागरी वस्तीमध्ये तलवारी घेऊन दहशत माजवण्याचं धाडस या 15-20 गुंडांच्या टोळक्यानं दाखवलं. या सगळ्यामुळे नागरिक खूप घाबरले होते. विशेष म्हणजे, पोलिसांना (police) अगदी उशिरापर्यंत या प्रकरणाची साधी माहितीदेखील नव्हती. या सगळ्या घटनाक्रमामुळे उल्हासनगरमधील कायदा-सुव्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे निघाले आहेत.
उल्हासनगरमधील कॅम्प नंबर दोनच्या हनुमान नगर परिसरात रात्री एकच्या सुमारास 15 ते 20 गुंड थेट रहिवाशांच्या घरात घुसले. त्यांच्या हातात तलवारी, लोखंडी रॉड होते. त्यांनी दगडफेकसुद्धा केली. हत्यारांच्या बळावर दहशत माजवत या गुंडांनी दिसेल त्या घरात घुसून तोडफोड करत मोठ्या प्रमाणात लूटमार केली. या सगळ्यात दहापेक्षा अधिक घरे आणि अनेक गाड्यांची तोडफोड केली.
उल्हासनगरमधील सराईत गुंडाची ही टोळी असल्याची माहिती मिळते आहे. सामान्य नागरिकांन तलवारीच्या धाक दाखवत त्यांनी घरातील रोख रक्कम आणि दागिनेदेखील लुटले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फूटेज तपासून पोलीस तपास करत आहेत.
भरवस्तीत गुंडांनी तलवारी दाखवत लूटमार केल्याचा धक्कादायक प्रकार उल्हासनगरमध्ये घडला आहे. हे सगळं CCTV कॅमेऱ्यात कैद झालं आहे. pic.twitter.com/eJ0GFsw8zr
— News18Lokmat (@News18lokmat) January 7, 2021
दरम्यान स्थानिकांनी पोलिसांना याची माहिती दिल्यावर पोलिसांनी घटनास्थळी येऊन फक्त विचारपूस केली आणि ते निघून गेल्यास आरोप स्थानिकांनी केला आहे. याप्रकरणी उल्हासनगर एक नंबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस घडलेल्या प्रकरासंबंधी बोलण्यास मात्र नकार देत आहेत.