खेड, 15 डिसेंबर : मुंबई गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway) खेडमधील भोस्ते घाटात बर्निंग कारचा थरार पाहण्यास मिळाला. मारुती सुझुकी कारने अचानक पेट घेतला आणि अवघ्या अर्धा तासात लाखमोलाच्या गाडीचा फक्त सांगडा उरला. सुदैवाने या दुर्घटनेतून पाच जण थोडक्यात बचावले आहे.
भोस्ते घाटात आज सकाळी 7 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. मंडणगडहुन पाच जण रत्नागिरीला मारुती बलेनो कारने जात होते. भोस्ते घाट चढताना अचानक गाडीने पेट घेतला आणि गाडीतील प्रवाशांनी प्रसंगावधान राखून गाडीतून बाहेर धाव घेतली, आणि काही क्षणात गाडी जळून खाक झाली. या कारमधून दोन महिला आणि तीन पुरुष असे पाच जण प्रवास करत होते. अवघ्या 30 मिनिटांत लाखामोलाच्या गाडीचा कोळसा झाला.
कार चालकाने पोलिसांना कळावल्यानंतर खेड पोलीस खेड नगरपालिकेचा अग्निशामक बंब घेऊन घटनास्थळी दाखल झाला आणि गाडीला लागलेली आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. जवळपास अर्ध्या तासाने ही आग विझवण्यात आली. या कारमधून आरोग्य विभागाचे कर्मचारी प्रवास करत होते. ते मंडणगड येथून रत्नागिरीला निघाले होते, असे पोलिसांनी सांगितले आहे.
मारुती बलेनोही कार सीएनजी अथवा एलपीजी नव्हती, तरी देखील गाडीला अचानक आग कशी लागली, असा प्रश्न उपस्थितीत झाला आहे. गेल्या महिन्यात देखील अशाच प्रकारे मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटात एका कारला आग लागली होती. महिना भरातील खेड मधील ही दुसरी घटना आहे.