कोलकाता,09 मार्च : मानसिक आजारांचं प्रमाण सध्या खूप वाढतंय. बदलत्या जीवनशैलीमुळे वाढलेला ताण सहन न होऊन अनेक जण मानसिक आजारांना बळी पडत आहेत. अशा व्यक्तींना खूप काळजीपूर्वक सांभाळावं लागतं. नाही तर दुर्घटना घडू शकतात. अशा अनेक दुर्घटना घडल्याही आहेत. आता कोलकात्यात अशीच एक घटना समोर आलीय. रुग्णाला गिळायला त्रास होत असल्यानं त्याच्या तपासण्या केल्या असता, त्याच्या अन्ननलिकेत 100 रुपयांच्या 2 नोटा असल्याचं आढळून आलं.
कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये बुधवारी (8 मार्च) एका 57 वर्षीय व्यक्तीवर उपचार करून त्याच्या अन्ननलिकेतून 100 रुपयांच्या 2 नोटा काढण्यात आल्या. डमडम इथली रहिवासी असणारी ही व्यक्ती मानसिक रुग्ण आहे. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, साधारण दीड महिन्यापूर्वी रुग्णाला गिळायला त्रास होऊ लागला.
जवळपासच्या डॉक्टरांना दाखवूनही त्रास कमी होत नव्हता. त्यामुळे शेवटी 1 मार्चला त्यांना RGKMCH रुग्णालयात आणलं. तिथेही नक्की काय झालंय, याचं निदान होत नव्हतं. त्यामुळे रुग्णाला गॅस्ट्रोइंटरोलॉजी विभागात हलवण्यात आलं. तिथं तपासण्या केल्यावर रुग्णाच्या अन्ननलिकेत 100 रुपयांच्या 2 नोटा अडकल्याचं लक्षात आलं; मात्र रुग्णाने त्या नोटा कधी खाल्ल्या होत्या, याबाबत कुटुंबीयांना काहीच माहिती नव्हती, असं वृत्त 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलं आहे.
डॉक्टरांनी त्या नोटा बाहेर काढल्यावर रुग्णाला अन्न व्यवस्थित गिळता येऊ लागलं. “रॅट टूथ फोरसेपचा वापर करून इंडोस्कोपीद्वारे एकेक नोट बाहेर काढण्यात आली. त्यानंतर आता रुग्णाची परिस्थिती सुधारते आहे,” असं गॅस्ट्रोइंटरोलॉजीचे सहयोगी प्राध्यापक सुजय रे यांनी सांगितलं. त्यांच्यासोबत शाहीद अझीझ यांनीही रुग्णावर उपचार केले.
(क्रूरतेचा कळस! व्यक्तीने घरात डांबून ठेवत घेतला 1 हजार कुत्र्यांचा जीव, कारण संतापजनक)
मानसिक रुग्ण असलेल्या 57 वर्षीय व्यक्तीच्या अन्ननलिकेत नोटा अडकल्यानं त्यांना गिळायला त्रास होत होता. रुग्णाची माहिती काढल्यावर 17 वर्षांपूर्वीही त्यांच्याबाबत अशी एक घटना घडल्याची माहिती डॉक्टरांना मिळाली. रुग्णानं त्यावेळी अॅसिड प्यायलं होतं. त्याचा परिणाम होऊन अन्ननलिका काहीशी रुंद झाली असल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं.
(शाळेच्या बाथरूममध्ये नेत 7 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, आरोपीचं पीडितेच्या मैत्रिणीसोबतही क्रूर कृत्य)
मानसिक आजारांमुळे रुग्णाच्या वागण्या-बोलण्यावर परिणाम होतो. अशा रुग्णांच्या सोबत सतत कुणीतरी असावं लागतं. नाही तर काही दुर्दैवी अपघात घडू शकतात. प्रसंगी जिवावरही बेतू शकतं. समाजात अशा मानसिक रुग्णांसाठी खास संस्थाही कार्य करत आहेत. तिथे त्यांची काळजी घेण्यासाठी विशेष व्यक्तींची नेमणूक केलेली असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.