जुन्नर, 27 जानेवारी : जुन्नर तालुक्यात ग्रामस्थांना बिबट्याचे आता दररोजच दर्शन होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बोरी बुद्रुक येथील कोरडे मळ्यात राहत असलेले सुरेश हनुमंता कोरडे यांच्या घराजवळ काल सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बिबट्या फिरत असताना दिसला आणि या मुक्त बिबट्याच्या व्हिडिओ त्यांनी आपल्या मोबाईल कैद केला. यावेळी कोरडे यांनी फटाके लावल्याने बिबट्याने या ठिकाणाहून पळ काढला होता. मात्र आज पुन्हा याच ठिकाणी बिबट्या येऊन बसला.
याच मळ्यात रहात असलेले बाबुराव कोरडे या शेतकऱ्याच्या वासरावर बिबट्याने हल्ला करून ठार केलेले आहे. तसंच राजुरी या गावातील गटकळ मळ्यात राहत असलेले तुषार हाडवळे हा युवक आपल्या शेतात गव्हाला पाणी भरत असताना अचानक बिबट्या समोर आल्याने तुषार याने तिथून पळ काढला. सुदैवाने बिबट्याने त्याच्यावर हल्ला न केल्याने तो यातून बचावला आहे.
हेही वाचा - पुण्यात डी कंपनीने थाटले होते दुकान, NCB ने 3 अड्डे केले उद्ध्वस्त
दरम्यान, जुन्नर तालुक्यातील पूर्व भागातील आळेफाटा, बोरी, माळवाडी, साळवाडी, जाधववाडी, राजुरी ही बिबट्या प्रवण क्षेत्रात येत असून या गावांमध्ये ऊसाचे क्षेत्र मोठया प्रमाणावर आहे. या परिसरात सध्या ऊस तोडणी सुरू असल्याने हे बिबटे मानवी वस्तीमध्ये येऊ लागले आहे.
बिबट्यांना स्वत:चे खाद्य मिळत नसल्याने हे बिबटे अन्नासाठी कोठेही फिरताना दिसून येत आहे. बिबट्यांनी या परिसरात गेल्या आठ दिवसात चार ते पाच जनावरे व कुत्र्यांवर हल्ला करून ठार केलेले आहे. भविष्यात या बिबट्यांनी मानवी वस्तीमध्ये येऊन माणसावर हल्ला केला तर मोठी दुर्घटना घडू शकते. यासाठी ज्या ज्या ठिकाणी बिबट्याचा वावर मोठया प्रमाणावर आहे त्या त्या ठिकाणी वनविभागाने पिंजरा लावावा अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे.