Home /News /maharashtra /

कल्याणमध्ये उच्चभ्रू वस्तीतील इमारतीमध्ये घराला आग, मात्र अग्निशमन दलामुळे मोठा धोका टळला

कल्याणमध्ये उच्चभ्रू वस्तीतील इमारतीमध्ये घराला आग, मात्र अग्निशमन दलामुळे मोठा धोका टळला

संपूर्ण फ्लॅटचे नुकसान झाले असले तरी अग्निशमन दल वेळेवर पोचल्याने मोठी दुर्घटना टळली.

कल्याण, 17 नोव्हेंबर : कल्याणमधील उच्चभ्रू वस्ती अशी ओळख असणाऱ्या गोदरेज हिल परिसरातील एका सोसायटीमध्ये घराला मोठी आग लागली. यामध्ये संपूर्ण फ्लॅटचे नुकसान झाले असले तरी अग्निशमन दल वेळेवर पोहोचल्याने मोठी दुर्घटना टळली. कल्याण पश्चिमेतील गोदरेज हिल परिसरातील टेकडीवर एकोरिना -कॅसोरीना नावाची मोठी सोसायटी आहे. यातील एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील प्रशस्त घराला ही आग लागली. बेडरूममध्ये असणाऱ्या एसीमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळे अवघ्या काही मिनिटांत ती आग संपूर्ण घरात पसरल्याची प्राथमिक माहिती आहे. आग लागली तेव्हा घरामध्ये काही सदस्यही उपस्थित होते. आगीने अवघ्या काही वेळातच रौद्ररूप धारण करीत संपूर्ण घराला विळखा घातला. ही आग एवढी मोठी होती की घराच्या गॅलरीतून वरच्या गॅलरीपर्यंत पसरू लागली. मात्र अग्निशमन दल वेळेवर पोहोचल्याने ही आग इमारतीमध्ये पसरू शकली नाही आणि मोठा धोका टळला. दरम्यान, एवढी मोठी सोसायटी असूनही त्याठिकाणी असणारी अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत नसल्याची माहितीही समोर येत आहे. ज्यामुळे या आगीमध्ये संपूर्ण घराचे मोठे नुकसान झालं. याबाबत आपल्या विभागाकडून संबंधित सोसायटीला नोटीस बजावणार असल्याची माहिती अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी दिली. अग्निशमन दलाचे कोलते, विनायक लोखंडे यांच्यासह राठोड, पितांबरे या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करत ही आग आटोक्यात आणली.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Fire, Kalyan

पुढील बातम्या