सासरवाडीला थांबले, साखरझोपेत असलेल्या दीड वर्षांच्या नातवाला आजीने विहिरीत फेकले

सासरवाडीला थांबले, साखरझोपेत असलेल्या दीड वर्षांच्या नातवाला आजीने विहिरीत फेकले

दीड महिन्यापासून फरार असणाऱ्या आरोपी महिलेला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने इंदापूर येथून अटक केली आहे.

  • Share this:

मधुकर गलांडे, प्रतिनिधी

इंदापूर, 20 फेब्रुवारी :  आजी-आजोबा हे नातवाचे पहिले मित्र समजले जातात. परंतु, एका आजीने आपल्या नातवाचा खून केल्याची घटना काही दिवसांपासून बारामतीतील इंदापूरमध्ये घडली होती. अखेर दीड महिन्यानंतर या वृद्ध महिलेला अटक करण्यात आली आहे.

बारामतीमधील इंदापूर तालुक्यातील आपल्या सासरवाडीत मुक्कामी राहिलेल्या दीड वर्षाच्या नातवाला ४ जानेवारी २०२० ला पहाटे ४.३० वाजता साखर झोपेत असतानाचा घरा शेजारील विहिरीत टाकून देऊन खून केला होता.  दीड महिन्यापासून फरार असणाऱ्या आरोपी महिलेला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने  इंदापूर येथून अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, रवींद्र जराड हे त्यांची पत्नी गौरी आणि दीड वर्षाचा मुलगा, मयत वेदांत रवींद्र जराड यांच्यासह इंदापूर तालुक्यातील तनपुरवाडी, व्याहाळी इंदापूर इथं आपल्या सासरवाडीत ३ जानेवारी २०२० रोजी काही कामानिमित्त आले होते. रात्री बारामतीला घरी जायला उशीर झाल्याने त्यांनी आपल्या दीड वर्षाच्या मुलासह आणि पत्नीसह तिथंच मुक्कामी राहिले होते.  त्यानंतर ते झोपेत असताना पहाटे ४.३० वाजता  सासू सुलोचना सदाशिव तनपुरे  यांनी या लहान बाळाला घरा शेजारच्या पाणी असलेल्या विहिरीत टाकून दिले होते.

सकाळी ६ वाजता रवींद्र जराड हे झोपेतून उठले असता,  त्यांनी त्यांचा मुलगा वेदांत याचा शोध घेतला तेव्हा तो कुठेही दिसला नाही. त्यावेळी त्यांची सासु सुलोचना तनपुरे यांना विचारले असता, त्यांनी काहीच सांगितलं नाही, त्यानंतर त्यांनी शोधाशोध केली असता, त्यांनी शेजारील विहिरीजवळ गेले असता, विहिरीत पाण्यावर मुलाचा मृतदेह तरंगत असल्याचं दिसून आलं.

या प्रकरणानंतर मुलाच्या वडिलाने  इंदापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपल्या सासूविरोधात ४ जानेवारी २०२० रोजी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर महिला आरोपी तनपुरे दीड महिन्यापासून फरारी झाल्या होत्या. मात्र, गुरुवारी त्या इंदापूर तालुक्यातील व्याहळी येथील बस स्थानकावर येणार आहेत, अशी माहिती पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर त्यांनी सापळा लावून, महिला पोलीस अंमलदार यांच्या मदतीने महिलेला ताब्यात घेतले. चौकशी केल्यानंतर या महिलेला अटक करण्यात आली. या महिलेची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाई करण्यासाठी इंदापूर पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बिराप्पा लातुरे करीत आहेत.

ही कारवाई पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखाचे प्रभारी अधिकारी पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, पोलीस हवालदार, अनिल काळे, रविराज कोकरे, पोलीस नाईक प्रवीण मोरे, महिला पोलीस हवालदार पी.जी.कांबळे यांनी केली. आरोपी महिलेस इंदापूर फौजदारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.

First published: February 20, 2020, 4:55 PM IST

ताज्या बातम्या