• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • किल्ले रायगडावर सापडली शिवकालीन सोन्याची बांगडी

किल्ले रायगडावर सापडली शिवकालीन सोन्याची बांगडी

नुकतंच रायगडावर सोन्याची बांगडी आणि देवपूजेचं निरांजन सापडलं आहे.

  • Share this:
कोल्हापूर, 3 एप्रिल : हिंदवी स्वराज्याची राजधानी अशी ओळख असलेल्या किल्ले रायगडावरील (Raigad Fort) जगदीश्वर मंदिराजवळ चौथऱ्याच्या भागात शिवकालीन वस्तूंचे अवशेष सापडले आहेत. रायगड प्राधिकरण मार्फत हे उत्खनन सुरू आहे. गेल्या तीन वर्षांपासून पुरातत्व विभाग आणि प्राधिकरण हे उत्खनन करत असून या उतखननात आतापर्यंत अनेक महत्वाच्या वस्तू सापडल्या आहेत. नुकतंच इथं सोन्याची बांगडी आणि देवपूजेचं निरांजन सापडलं आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी या वस्तूंबद्दल आनंद व्यक्त केला असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील सोन्याचे नाणे म्हणजे होन देखील मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह विविध वस्तू आणि भांडीही इथं सापडली आहेत आणि गेल्या दोन दिवसांमध्ये या उत्खननामध्ये एक सोन्याची बांगडी आणि देवपूजेचा निरंजन सापडल्याने रायगडाच्या दगड मातीत शिवकालीन इतिहासाची साक्ष पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. 250 हून अधिक इमारतींचे चौथरे आजही रायगडावर जशास तसे अवस्थेत आहेत. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी किल्ले रायगड बांधला आणि स्वराज्याची राजधानी निर्माण केली होती. त्यामुळे इथं सापडलेला शिवकालीन वस्तूंचा हा ठेवा इतिहासासाठी खूप महत्त्वाचा आहे. या उत्खननामध्ये ज्या वस्तू सापडल्या आहेत त्या वस्तू संग्रहालयात ठेवल्या जाणार असून त्या वस्तूंचे जतनही केले जाणार आहे. किल्ले रायगडावर आतापर्यंत उत्खननामध्ये घराच्या छतावरच्या खपऱ्या, तोफगोळे सुरुंगाच्या गोळ्याचं कवच, घोड्याचे रिकीब, बांधकामासाठी वापरले जाणारे वेगवेगळ्या आकारातील खिळे, मातीची भांडी, दगडी मूर्ती, शेतीची अवजारे अशा अनेक छोट्या मोठ्या वस्तू सापडल्या आहेत. या सगळ्या वस्तू पुरातत्व विभागाकडे सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. एकीकडे, रायगडावर हे उत्खनन जरी सुरू असलं तरी राज्याच्या अनेक गड किल्ल्यांची दुरावस्था होत आहे. या गड किल्ल्यांचे संवर्धन करणे आवश्यक आहे आणि पर्यटकांनीही गडकिल्ल्यांवर जाताना नियमावली पाळूनच आणि इतिहासाचा आदर राखत पर्यटन करणं महत्त्वाचं आहे.
Published by:Akshay Shitole
First published: