विजेच्या धक्क्याने मुलासह वडिलांचाही मृत्यू, यवतमाळमधील घटना

विजेच्या धक्क्याने मुलासह वडिलांचाही मृत्यू, यवतमाळमधील घटना

दत्तात्रय केशव घुगे आणि भावेश दत्तात्रय घुगे अस मृतकाचे नाव आहे.

  • Share this:

यवतमाळ, 5 जून : मुलगा संकटात असताना बाप धावून जाणार नाही, असं कधीही होत नाही. मात्र मुलाचा आक्रोश ऐकून धाव घेतलेल्या पित्याच्याही नशिबी मृत्यू आल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी तालुक्यातील कवठा बाजार येथे विजेच्या धक्क्याने पिता पुत्राचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दत्तात्रय केशव घुगे आणि भावेश दत्तात्रय घुगे अस मृतकाचे नाव आहे.

भावेश हा आज पहाटे चार वाजताच्या सुमारास लघुशंकेसाठी घराच्या बाहेर गेला असता त्याला अर्थिंगच्या तारेचा स्पर्श होवून जोरदार विजेचा धक्का बसला. त्यानंतर तो खाली कोसळला. त्यावेळेस त्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकून वडील दत्तात्रेय त्याच्या मदतीला धावले. तेव्हा त्यांनासुद्धा या तारेचा जोरदार धक्का बसला आणि तेसुद्धा जागेवरच कोसळले.

या दोघांचा आवाज ऐकून भावेशचा मामा त्यांच्या मदतीला धावला तेव्हा त्याला सुद्धा विजेचा शॉक लागला. मात्र दत्तात्रय घगे आणि भावेश गंभीर असल्या कारणाने त्यांना उपचारासाठी आर्णीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघांनाही मृत घोषित केले. या घटनेचा तपास आर्णी पोलीस करत आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहे. त्यातच आता पावसाळ्यामध्ये अशा घटना वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं जात आहे.

First published: June 5, 2020, 10:44 PM IST

ताज्या बातम्या