पुणे, 24 जून : दुपारच्या वेळी सूर्याभोवती (Sun) वेगळ्या प्रकारचे कंकण (Circle) दिसल्यामुळे सामान्यांमध्ये दिवसभर या विषयावरून जोरदार चर्चा रंगली होती. दुपारी सूर्याच्या दिशेनं पाहिल्यानंतर त्याच्याभोवती कंकण असल्याप्रमाणे आकृती (Figure) तयार झाल्याचं दिसून येत होतं. हा नेमका काय प्रकार आहे, हे अनेकांना माहित नसल्यामुळे त्याबाबत दिवसभर नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू होती.
अनेकदा आकाशात अति उंचावर विरळ ढग (Clouds) तयार होतात. त्यामध्ये बर्फाचे असंख्य स्फटिक (Ice Crystals) असतात. त्यांना क्रिस्टल्स असं म्हटलं जातं. या स्फटिकांचा आकार षटकोनी असून त्यांच्यातील अपवर्तन कोन हा 60 अंशांचा असतो. या कारणामुळे सूर्याचे किरण या स्फटिकांमधून आरपार जाताना त्यांचा कोन (angle) बदलतो. सूर्यकिरण त्यांच्या मूळ दिशेपासून 22 अंश विचलित (divert) होतात.
तेजोवलय आणि विज्ञान
एखाद्या वस्तूभोवती तेजोवलय निर्माण होण्यासाठी त्या वस्तूला केंद्रस्थानी ठेवून साधारण 20 ते 25 अंशांच्या कोनात प्रकाशकिरण सोडण्यात येतात. दुपारी सूर्याभोवती दिसणाऱ्या कंकणामागेही हेच कारण असल्याचं वैज्ञानिक सांगतात. तेजोवलय तयार होण्यासाठी ज्या कोनीय त्रिज्येची गरज असते, तितक्याच म्हणजे 22 अंशांनी सूर्यकिरण विचलित झाल्यामुळे कंकणाचा आकार तयार झाला. त्यातून तयार झालेले प्रकाशाचे वर्तुळ म्हणजे सूर्याभोवती तयार झालेलं कंकणच आहे, असा भास होतो. या तेजोवलयाला ‘इंद्रवज्र खळे’ असं म्हटलं जातं.
हे वाचा - निसर्ग चक्रीवादळाच्या झळा अद्यापही कायम, धो-धो पाऊस आणि सरणावरील मृतदेहांचे हाल
केवळ नैसर्गिक अविष्कार
हे खळं म्हणजे केवळ एक नैसर्गिक अविष्कार आहे. काही लोक हे 'खळे' दिसणे अशुभ मानतात परंतु त्यात काहीही तथ्य नसल्याचे खगोल शिक्षक एस. पी. शिंदे यांनी सांगितलंय. निसर्गातील प्रत्येक गोष्ट घडण्यामागे एक विज्ञान असतं. ते समजून न घेता प्रचलित समजुतींवर अनेकजण विश्वास ठेवत असल्याचं दिसतं. त्यामुळे वैज्ञानिक सत्यापासून नागरिक दूर तर राहतातच, शिवाय अनेक गैरसमज पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्याला दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा वैज्ञानिक अर्थ समजून घेण्याची सवय लागणे गरजेचं असल्याचं शास्त्रज्ञांचं मत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra, Science