मुंबई, 6 डिसेंबर : ईडीकडून तपास केला जात असलेल्या टॉप्स सिक्युरिटी प्रकरणातील तक्रारदार रमेश अय्यर यांच्यावर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल दाखल केला आहे. रमेश अय्यर यांच्यावर टॉप्स सिक्युरिटीमध्ये आर्थिक फसवणुकीसंदर्भात आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हा दाखल केला आहे.
टॉप्स सिक्युरिटीचे मालक राहुल नंदा यांनी रमेश अय्यर यांच्या विरुद्ध तक्रार केली आहे. रमेश अय्यर यांनी आर्थिक घोटाळा केला, ज्यामुळे टॉप्स कंपनीला मोठे नुकसान झाल्याचा आरोप मालकाकडून करण्यात आला आहे. रमेश अय्यर ही तीच व्यक्ती आहे ज्यांच्या तक्रारीनंतर प्रताप सरणाईक यांची चौकशी ईडीकडून करण्यात येणार आहे. तसंच याप्रकरणी अमित चांदोळेला अटकही झाली आहे.
ईडीकडून या प्रकरणात तपास चालू असतानाच तक्रारदारावरच मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने आता ईडी विरुद्ध मुंबई पोलीस असा सामना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीनं छापेमारी केली होती. त्यानंतर ईडीकडून सरनाईक यांचे सुपुत्र विहंग सरनाईक यांची देखील चौकशी करण्यात आली. प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय आणि कंपनीत मोठ्या पदावर असलेले अमित चंडोळे यांना ईडीनं दोन दिवसांच्या चौकशीनंतर ताब्यात घेतलं आहे.
अमित चंडोळे हे आमदार प्रताप सरनाईक यांचे बालपणीचे मित्र आहेत. प्रताप सरनाईक यांच्यासोबत ते डोंबिवलीहून ठाण्यात व्यवसायासाठी आले. दोघांनी मिळून व्यवसाय सुरू केला. विहंग ग्रूप ऑफ कंपनीला मोठा फायदा होत गेला. अमित चंडोळे सध्या या कंपनीच्या डायरेक्टरपदावर आहेत. याशिवाय वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये देखील त्यांची भागीदारी आहे. टॉप सिक्युरीटी आणि विहंग ग्रुप ॲाफ कंपनी यांच्यातील मुख्य दुवा म्हणजे अमित चंडोळे आहे असं सांगितलं जात आहे.