सोलापूर, 25 ऑगस्ट : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अज्ञाताने घरात घुसून आपल्या 9 महिन्याच्या बाळाचा खून केल्याचा बनाव बार्शी ग्रामीण पोलिसांनी उघड केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे चक्क जन्मदात्या आईनेच आपल्या पोटच्या गोळ्याची हत्या केल्याचं उघड झालं आहे. बार्शीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर भोरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
22 ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास एका अज्ञात चोराने घरात शिरुन 9 महिन्याच्या चिमुकल्याचा मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून खून केल्याची माहिती अश्विनी तुपे यांनी पोलिसांना दिली होती. बार्शी तालुक्यातील वांगरवाडी गावात ही घटना घडली होती. याबाबत बार्शी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सार्थक स्वानंद तुपे असे या हत्या झालेल्या 9 महिन्याच्या चिमुकल्याचे नाव होते.
दुपारच्या सुमरास दोन व्यक्तींनी घरात प्रवेश केला. त्यानंतर मी किचनमध्ये काम करत असताना चिमुकल्याचा रडण्याचा आवाज आल्याने बाहेर आले. त्यावेळी एक हाफ पॅन्ट आणि बनेल घातलेली व्यक्ती माझ्या बाळाचा चार्जरच्या वायरने गळा आवळत होता. त्यामुळे आपल्या चिमुकल्याला वाचवण्यासाठी अश्विनी यांनी क्षमायाचना केली. मात्र तरीही हल्लेखोराने बाळाचा गळा आवळून बाळाला जमिनीवर टाकले आणि मला मारहाण करुन माझे हातपाय बांधून घरातील कपाट उचकटले. मात्र कपाटात काहीच न मिळाल्याने माझ्या गळ्यातील 2 ग्रॅम सोन्याचे गंठन चोराने लांबवल्याची माहिती आपल्या कुटुंबीयांना दिली होती. याबाबत फिर्यादीतही अशीच माहिती दिली होती.
मात्र तीन दिवसानंतर बार्शी ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे. यामध्ये ही हत्या चक्क जन्मदात्या आईनेच केल्याचे पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. अश्विनी तुपे यांना दोन मुले होती. त्यापैकी मोठा मुलगा आणि मृत छोटा मुलगा यांच्या वयात खूप कमी अंतर होते. त्यामुळे दोन्ही मुलांना सांभाळण्याचा कंटाळा आल्याने अश्विनी यांनी आपल्या 9 महिन्याच्या स्वानंद याची हत्या केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी अश्विनी तुपे यांना अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे. मात्र या घटनेमुळे बार्शी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.