जालना, 04 फेब्रुवारी : जालन्यातल्या भोकरदन तालुक्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. गुरांच्या गोठ्याला लागलेल्या आगीमध्ये 3 लहान मुलांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या संपूर्ण घटनेमुळे जालना परिसर हादरला आहे.
भोकरदनच्या क्षीरसागर गावातली ही घटना आहे. गुरांच्या गोठ्यामध्ये ही लहान मुलं खेळत होती. अचानक गोठ्याला आग लागली. आगीची तीव्रता अचानक वाढल्याने या चिमुकल्यांना बाहेर पडता आलं नाही. त्यातच आगीत होरपळून त्यांचा मृत्यू झाला आहे.
या मृतांमध्ये दोन मुलं आणि एका मुलीचा समावेश आहे. सार्थक मारोती कोलते वय-6, वेदांत विष्णु मव्हारे वय-5 आणि संजीवनी गजानन मव्हारे वय-5 अशी मृत चिमुरड्यांची नावं आहेत.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझवण्यात यश आलं, पण त्यांनतर ही धक्कादायक माहिती समोर आली. घटना घडताच भोकरदन पोलिसही घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी गोठ्यातून या 3 चिमुरड्यांचा मृतदेह बाहेर काढला. तो नजिकच्या स्थानिक रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पण, घरातल्या हसत्या खेळत्या पाखरांना अशा पद्धतीने गमावल्याने मृतांच्या कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. तर संपूर्ण परिसरातून यावर शोक व्यक्त केला जात आहे.
VIDEO: नवऱ्याने 'त्या' अवस्थेत रंगेहात पकडलं पत्नीला, बांबूने केला प्रियकराचा मर्डर