Home /News /maharashtra /

परळी येथील 90 भाविक वृंदावनमध्ये अडकले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली आर्त हाक

परळी येथील 90 भाविक वृंदावनमध्ये अडकले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली आर्त हाक

देशात लॉकडाऊन केल्यामुळे तीर्थयात्रा व भागवत कथेला गेलेले बीड जिल्ह्यातील परळी शहरातील 90 महिला-पुरुष भाविक वृंदावन (उत्तर प्रदेश) येथे अडकले आहेत.

बीड, 25 मार्च: देशात लॉकडाऊन केल्यामुळे तीर्थयात्रा व भागवत कथेला गेलेले बीड जिल्ह्यातील परळी शहरातील 90 महिला-पुरुष भाविक वृंदावन (उत्तर प्रदेश) येथे अडकले आहेत. रेल्वे रद्द झाल्याने या भाविकांवर मथुरा, वृंदावनमध्येच धर्मशाळेत अडकून पडण्याची वेळ आली आहे. देशात 22 मार्चला जनता कर्फ्यू व त्यानंतर लॉकडाऊन केल्याने 22 मार्चपासून रेल्वे गाड्या रद्द झाल्या आहेत. यामुळे या 90 जणांना परळीकडे येता येत नाही. त्यात 25 मार्चपासून त्यांचे जेवणाचे हाल सुरू झाले आहेत. "कसंही करून आम्हाला परळीकडे येऊ द्या, आर्त हाक वृंदावन येथे अडकलेल्या भाविकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. श्याम महाराज उखळीकर यांच्या भागवत कथेला परळी शहरातील संत सावता माळी नगर ,कृष्णा नगर सिद्धेश्वरनगर, किर्ती नगर, देशमुख गल्ली येथील 80 जण तसेच पानगाव ,परभणी व पंढरपूर येथील भाविक 16 मार्च रोजी परभणी येथून सचखंड एक्सप्रेसने वृंदावन येथे आयोजित भागवत कथा श्रवण कार्यक्रमला गेले होते. कार्यक्रम आटोपून 22 मार्चला सगळ्यांनी रेल्वेचं रिझर्व्हेशन केलं होतं. पण जनता कर्फ्यू, लॉकडाऊनमुळे रेल्वे बंद केल्याने वृन्दावन मध्ये अडकलेल्या 90 जणांना परळी येथे येण्याची कुठलीही सुविधा नाही. पर्यायाने त्यांना आश्रममध्ये मुक्काम करावा लागत आहे. आम्हाला परळीकडे यायचे आहे. कसंही करून तिकडे आणा, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे भाविकांनी केली आहे. कोरोनाच्या आणिबाणीच्या परिस्थितीमुळे अडचणी येत असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे राज्यात दिवसभरात कोरोनाचे तब्बल 15 नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 122 वर पोहोचली आहे. मुंबईमध्ये 5 आणि ठाण्यात एक रुग्ण आढळून आला आहे. दिवसभरात राज्यात कोरोनाव्हायरसचे एकूण 15 रुग्ण आढळून आलेत. सकाळी सांगलीमध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांना व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं . राज्यावर असलेल्या कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी लोकांना दिलासा देण्याचाही प्रयत्न केला आहे. 'जीवनाश्यक वस्तूंची दुकाने उघडे असतील. कोणत्याही वेळा नसणार आहेत. भाजीपाल्याची दुकाने बंद होणार नाहीत. कृपया गर्दी करू नका,' असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. 'कोरोनाच्या संकटामुळे अनेक अडचणी येत असल्या तरीही आता तुम्ही सर्व घरी आहात. घरात बसून कुटुंबियांसोबत आनंद घ्या,' असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केलं. तसंच मी घरात बसून काय करतो, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर मी घरी मिसेस मुख्यमंत्र्यांचं ऐकतो, तुम्हीही तुमच्या होम मिनिस्टरचं ऐका, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.जगभरात आतापर्यंत 18 हजार लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे. तर लाखो लोकांवर सध्या उपचार सुरू आहेत. भारतात जवळपास 500 हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहेत. धक्कादायक म्हणजे कोरोनानं भारतात 11 बळी घेतला आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

पुढील बातम्या