कल्याण, 18 ऑक्टोबर: नवरात्र अर्थात घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी कल्याणमध्ये अनोखा योगायोग पाहायला मिळाला. कल्याण (पश्चिम) येथील एका रुग्णांलयात एकाच दिवशी 9 मुलींचा जन्म झाला. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या दुर्मिळ योगायोगाची वैद्यकीय क्षेत्रासह सगळीकडेच चर्चा होत आहे.
कल्याणातील सुप्रसिद्ध डॉ. अश्विन कक्कर यांची सामाजिक आणि संवेदनशील व्यक्ती म्हणून सर्वत्र ओळख आहे. त्यांच्या मॅटर्निटी रुग्णालयातील शनिवारचा दिवस त्यांच्यासाठी काहीसा वेगळाच ठरला. शनिवारी त्यांच्या रुग्णालयात थोड्या थोडक्या नव्हे तर तब्बल 11 महिलांची प्रसूती करण्यात आली. ज्यामध्ये 11 पैकी 9 महिलांनी मुलींना जन्म दिल्याची माहिती डॉ. अश्विन कक्कर यांनी दिली.
विशेष म्हणजे कालपासून नवरात्रौत्सवाला सुरुवात झाली. या नवरात्रौत्सवाच्या पहिल्याच दिवशी रुग्णालयात 9 मुलींचा जन्म झाला. त्यामूळे जणू काही 9 जणींच्या रुपाने नवदुर्गांनीच जन्म घेतल्याची भावना व्यक्त होत आहे.
यंदा गरबा-दाांडियाविना नवरात्र...
दरम्यान, कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थिती लक्षात घेता यंदा नवरात्रौत्सव, दुर्गापूजा आणि दसरा सण कसा साजरा करावा, याबाबत राज्य सरकारनं मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.
सार्वजनिक नवरात्री उत्सव मूर्ती 4 फूटापेक्षा तर घरगुती 2 फूटापेक्षा मोठी नसावी, देवी मिरवणूक काढता येणार नाही, विसर्जन नियमावली पाळावी, मंडपस्थळी सॅनिटाझयरचा वापर करावा लागेल. दर्शन रांगेत सोशल डिस्टंसिंगचा नियम पाळावा लागेल, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
विशेष म्हणजे यंदा गरबा, दाांडिया कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर धार्मिक कार्यक्रमांच गर्दी न करता आयोजन करावे. कोविड-19 संकट लक्षात घेता सोशल डिस्टंसिंगच्या नियमावलीचं पालन करावं, 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या सरकारच्या मोहिम प्रचार जनतेच्या हितासाठी करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
दसऱ्याच्या दिवशी मात्र रावण दहन करता येणार आहे. मात्र, या कार्यक्रमाला गर्दी होणार नाही. सुरक्षित सामाजिक अंतर नियमावली पाळली जाणे गरजेचं असल्याचं म्हटलं आहे.