कोरोनाच्या संकटात 85 हजार बेरोजगारांना मिळाला रोजगार, तु्म्हीही करू शकतात नोंदणी

कोरोनाच्या संकटात 85 हजार बेरोजगारांना मिळाला रोजगार, तु्म्हीही करू शकतात नोंदणी

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संकटामुळे राज्यात बेरोजगारीची मोठी समस्या निर्माण झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 17 ऑक्टोबर: कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संकटामुळे राज्यात बेरोजगारीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. असं असतानाही कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागानं लॉकडाऊनच्या काळात एकूण 85 हजार 428 बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिल्याची माहिती राज्याचे कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी दिली आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यात आयोजित केलेले ऑनलाईन रोजगार मेळावे तसेच 'महास्वयंम वेबपोर्टल'मार्फत (mahaswayam) राबविण्यात येत आहे. फक्त सप्टेंबर महिन्यात 32 हजार 969 बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे. जानेवारी ते सप्टेंबरदरम्यान एकूण 1 लाख 17 हजार 843 बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे, असंही नवाब मलिक यांनी सांगितलं. कुशल उमेदवारांच्या शोधात असलेले खासगी, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योजक, कॉर्पोरेट्स यांनीही या वेबपोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांनी केले आहे.

हेही वाचा...पॅटर्न बदलू नये! शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून संजय राऊतांवर रोखठोक टीका

बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केलं आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहीतींसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. अशा प्रकारे बेरोजगार आणि उद्योजक यांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्याचे काम या वेबपोर्टलमार्फत करण्यात येते.

सप्टेंबरमध्ये या वेबपोर्टलवर 63 हजार 593 इतक्या नोकरी इच्छूक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यात मुंबई विभागात 27 हजार 252, नाशिक विभागात 6 हजार 644, पुणे विभागात 11 हजार 681, औरंगाबाद विभागात 9 हजार 161, अमरावती विभागात 5 हजार 9 तर नागपूर विभागात 3 हजार 846 बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली.

तसेच सप्टेंबरमध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे 32 हजार 969 उमेदवार नोकरीस लागले. यामध्ये मुंबई विभागात सर्वाधिक 20 हजार 805, नाशिक विभागात 2 हजार 244, पुणे विभागात 4 हजार 187, औरंगाबाद विभागात 3 हजार 128, अमरावती विभागात 1 हजार 293 तर नागपूर विभागात 1 हजार 312 इतके बेरोजगार उमेदवार नोकरीस लागले.

व्हॉटस्अॅप, स्काईप, झूम इंटरव्ह्यू.. 

कौशल्य विकास विभागाने लॉकडाऊनच्या काळात राज्यभरात पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्यांची मोठी मोहीम सुरु केली आहे. प्रत्येक जिल्हास्तरावर ऑनलाईन रोजगार मेळावे घेण्यात येत आहेत. एप्रिल ते सप्टेंबर महिन्यात 111 ऑनलाईन रोजगार मेळावे झाले.

सप्टेंबरमध्ये झालेल्या 35 मेळाव्यांमध्ये 236 उद्योजकांनी सहभाग घेतला. त्यांच्याकडील 16 हजार 683 जागांसाठी त्यांनी व्हॉटस्अॅप, स्काईप, झूम अॅप आदींच्या सहाय्याने ऑनलाईन मुलाखती घेतल्या. या मेळाव्यांमध्ये 9 हजार 856 नोकरी इच्छूक तरुणांनी सहभाग घेतला. त्यापैकी आतापर्यंत 3 हजार 936 तरुणांना रोजगार मिळाला आहे. उर्वरित जागांसाठी उर्वरित तरुणांमधून निवड प्रक्रिया सुरु आहे. सर्व उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यासाठी विभागामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत असेही मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

हेही वाचा...मोठी बातमी, राष्ट्रवादीच्या नेत्यासोबत एकाच गाडीने खडसेंचा प्रवास!

अशी करावी नोंदणी..

रोजगार उपलब्धतेसाठी विभागामार्फत मोहीम पातळीवर काम केले जाईल. नोकरी इच्छूक तरुणांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी आणि आधार क्रमांकासह नोंदणी करावी. आधी नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपली माहिती अद्ययावत करावी, तसेच कुशल उमेदवारांच्या शोधात असलेले खासगी, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योजक, कॉर्पोरेट्स यांनीही या वेबपोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांनी केले आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: October 17, 2020, 5:45 PM IST
Tags:

ताज्या बातम्या